Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : साडेतीन कोटी खर्च करूनही धूळ बसविण्यासाठी सात लाखांची पाणी फवारणी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पंचवटीतील पेठरोडवरील राऊ हॉटेल ते जकात नाक्यापर्यंतच्या चार किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी महापालिकेने साडेतीन कोटी रुपये खर्च केल्यानंतर या पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या मार्गावरून वाहने गेल्यानंतर मोठ्याप्रमाणावर धूळ उडत असते. यामुळे महापालिकेने पुन्हा यावर्षीही रस्त्यावरील धूळ खाली बसवण्यासाठी टँकरद्वारे पाणी फवारणीचा प्रस्ताव आणला आहे. यासाठी बांधकाम विभागाने महासभेवर सात लाख रुपये खर्चाला परवानगी मागणारा प्रस्ताव ठेवला आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील पंचवटी विभागातून नाशिक ते पेठ हा राष्ट्रीय महामार्ग असून महापालिका हद्दीत हा महामार्ग महापालिकेकडे वर्ग केला आहे. महापालिकेने तो वर्ग करून घेतल्यापासून आधीच्याच कच्च्या रस्त्यावर डागडुजी केली जाते. मात्र, मुळापासून हा रस्त्याचे काम न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होत असते. यावर्षीही हॉटेल राऊ ते जकात नाक्यापर्यंतच्या चार किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, या रस्त्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्याच्या साईडपट्ट्या पूर्णपणे गाळात रुतल्यामुळे या रस्त्याच्या कडेने पायी चालणेही दुरापास्त होत असते. आता पाऊस उघडल्यामुले रस्त्याच्या कडेचा गाळ सुकून त्याचा धुराळा उडत असतो.

मागील वर्षीही असाच प्रकार घडल्याने त्यावेळी रस्त्याच्या कामासाठी स्थानिकांना आंदोलन केले होते. गेल्यावर्षी धुळीसंदर्भात नागरिकांकडून तक्रार आल्यानतंर टँकरने पाणी मारून धूळ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिवसभरातून चार टँकरद्वारे रस्त्यावर पाणी मारले जात असल्याचे दाखवून देयक काढून घेण्याचा प्रकार वादात सापडला होता. दरम्यान महापाकिलेच्या बांधकाम विभागाने मागील उन्हाळ्यात या रस्त्याची साडेतीन कोटी रुपये खर्चून दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही पुन्हा रस्ता जैसे थे झाल्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने टँकरद्वारे फवारणी केली असून  पुन्हा एकदा पाणी फवारणीचे देयके काढण्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे हा प्रस्ताव पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ठेकेदाराने एकेका दिवशी चार चार टँकरने पाणी टाकून बिल काढले होते. त्याच धर्तीवर पुन्हा देयक काढून घेण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.