नाशिक (Nashik) : अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या सातपूर-गरवारे पॉइंट (सातपूर-अंबड) लिंकरोड हा औद्योगिक वसाहतीतील रस्ता विकसित केला जाणार असून त्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. अवजड वाहनांची वर्दळ तसेच वांरवार खोदकाम झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर अंबडमार्गे त्र्यंबककडे जाणारी वाहतूकदेखील या भागातून वळवली जाणार आहे.
महापालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे दोन हजार ४७७ कोटींचे अंदाजपत्रक मागील आठवड्यात सादर करण्यात आले. अंदाजपत्रकामध्ये ७०१ कोटी रुपये विकासकामांवर खर्च केले जाणार असून यातही रस्ते कामांसाठी जवळपास १८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २९९ कोटी रुपये बांधकाम, विद्युत, उद्यान व मलनिस्सारण विभागासाठी खर्च केले जाणार आहेत. रस्त्यांची कामे करताना यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये विशेष करून मोठ्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
सीबीएस ते कॅनडा कॉर्नर व एल आकारात गंगापूर नाक्यापर्यंतचा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, दोन कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च केले जाणार आहे. त्याचबरोबर सर्वाधिक खर्च सिडको विभागातील गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉईंट व पुढे पपया नर्सरीपर्यंतच्या रस्त्यावर केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून हा रस्ता जातो. अनेक वर्षांपासून रस्ता तयार करण्याची मागणी होती. अवजड वाहनांमुळे रस्ता खचला, त्याचबरोबर एमएनजीएल व अन्य कामांसाठी वांरवार रस्ता खोदण्यात आल्याने दुरवस्था झाली. त्यामुळे हा रस्ता विकसित केला जाणार आहे.
पेठ रोडवर सात कोटींचा खर्च
पेठ रोडवरील महापालिकेच्या हद्दीत तवली फाट्यापर्यंतचा जवळपास चार किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन झाले. स्मार्टसिटी कंपनीच्या निधीतून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु स्मार्टसिटी कंपनीने निधी वर्ग करण्यास नकार दिला. महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास दोन कोटींचे टेंडर काढले आहे. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व रुंदीकरणासाठी ७१ कोटी रुपये खर्चाचा आराखडा महापालिकेने तयार केला. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने तो रस्ता करण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर आता महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी सात कोटी रुपये नव्याने तरतूद केली आहे. पुढील आर्थिक वर्षात पश्चिम विभागात १५ कोटी रुपये, पूर्व विभागात ४१ कोटी, पंचवटी विभागात ४४, नाशिकरोड विभागात सोळा, सिडको विभागात २७, तर सातपूर विभागात बारा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.