नाशिक (Nashik) : नाशिक शहरात मागील महिन्यात झालेला युवा महोत्सव व त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा यामुळे महापालिकेच्या (NMC) बांधकाम विभागाने शहर सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी यावर जवळपास ३५ कोटी रुपये खर्च केला आहे. या खर्चाला महासभेची कार्योत्तर मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. या मान्यतेनंतर या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जाणार आहे. ऐनवेळी ठरलेल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या बांधकाम, विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान व आरोग्य विभागाने तातडीने केलेल्या कामांना आता कार्योत्तर मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान दौऱ्याच्या नावाखाली प्रशासनाने कोणती टेंडर प्रक्रिया, अंदाजपत्रक न करता केलेल्या वारेमाप खर्चाला राज्य सरकारने मंजुरी न दिल्यास हा बोजा महापालिकेवर पडू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक शहरात युवा महोत्सव उद्घाटनासाठी येऊन गेले. त्यांच्या दौऱ्यामुळे शहर चकाचक झाले. पण त्यासाठी शहर सजावट व डागडुजीवर तब्बल ३५ कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च करताना शासनाच्या प्रचलित पद्धतीचा वापर करण्यात आला नाही. आता महापालिकेने हा खर्च शासनाने द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे. त्यासाठी या कामांना कार्योत्तर मंजुरी घेण्याचे काम सुरू आहे.
युवा महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेने ठेकेदाराकडून दुभाजक रंगरंगोटी व सुशोभीकरण, तपोवन परिसरात पार्किंग उभारणे व जमीन सपाटीकरण करणे, पुलांची दुरुस्तीसह रंगरंगोटी, रिंगरोडचे अस्तरीकरण, दिशादर्शक फलक, कॅटआय बसवणे, थर्मोप्लास्टिक पेंट मारणे, रोड मार्कर, साइन बोर्ड बसवणे, गोदाघाट डागडुजी व रंगरंगोटी, वस्त्रांतरगृह दुरुस्ती व डागडुजी, सभास्थळी बॅरेकेडिंग, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व स्वच्छता करणे, काळाराम मंदिरात मंडप, पडदे, ग्रीन कार्पेट टाकणे, मंदिरासमोरील उद्यानाची दुरुस्ती, शहरातील भिंतीवर रामायणाचे देखावे रेखाटणे, महत्त्वाच्या रस्त्याचे अस्तरीकरण, खडीकरण, फुटपाथ, दुरुस्ती व सजावट अशी विविध कामेकरून घेतली. यासाठी नेहमीच्या तुलनेत ठेकेदारांकडून सढळ हाताने कामे करून घेण्यात आली आहेत. आता बांधकाम विभागाकडून ही कामे नियमात बसवून त्याचा हिशेब महासभेवर सादर केला जात आहे. दरम्यान शहरात लखलखाट करणारा विद्युत विभाग, फुलांची सजावट करणारा उद्यान विभाग, आरोग्य व सफाई करणारा घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्याकडून झालेल्या निधी खर्चाचा अद्यापही पूर्ण हिशेबच झालेला नाही.
असा झाला खर्च
भिंतींवर साकारली 'रामायण' दृश्ये : १ कोटी रुपये
काळाराम मंदिर परिसरात रंगरंगोटी, ओटा दुरुस्ती ; २५ लाख रुपये
मंडप, स्टेज, पडदे, ग्रीन कार्पेट व इतर आवश्यक कामे : २५ लाख रुपये
रस्ते दुरुस्ती, सजाक्ट : १ कोटी रुपये
काळाराम मंदिर ते रामकुंड बेरिकेडिंग, रंगरंगोटी : ४० लाख रुपये
वस्त्रांतरगृह व काळाराम मंदिर रंगरंगोटी : १८ लाख रुपये
सभास्थळ रिंगरोड : २.५ कोटी रुपये
तपोवन पार्किंग : १.५ कोटी रुपये
मोदी मैदान रोड : ४५ लाख रुपये