road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : तब्बल 104 कोटी रुपयांतून बुजणार शहरातील रस्त्यांवरील खड्डे

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने नाशिक शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या रस्ते तोडफोडीच्या बदल्यात रस्ते दुरुस्तीसाठी नाशिक महापालिकेकडे १६० कोटी रुपये जमा केले असून त्यातील १०४ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी महासभेत मान्यता दिली आहे. यामुळे पावसाळा उघडल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये या रस्ते दुरुस्तीला प्रारंभ होणार आहे.

नाशिक शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड या कंपनीला महापालिकेने परवानगी दिली असून त्या बदल्यात संबंधित रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडून रक्कम घेतली जाते. या कंपनीने मे अखेरपर्यंत रस्त्यांचे खोदकाम केले. यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती करणे महापालिकेला शक्य झाले नाही. यावर्षी कमी पावसाळा असूनही आधीच खोदल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांवर आणखी खड्डे पडून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला केलेल्या या खोदकामामुळे सलगपणे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिकांकडून या रस्त्यांबाबत मोठी ओरड सुरू झाली. यामुळे मागील आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन आटोपल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक रस्त्यांची पाहणी केली. यामुळे महापालिका 'अॅक्शन मोड' मध्ये आली असून त्यांनी महापालिकेच्या सहा विभागांमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नाशिक महापालिकेने गेल्या पाच वर्षात शहरात रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते तयार करण्यासाठी बाराशे कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गुरुवारी (ता. १०) महासभेवर १०४ कोटी ३३ लाख रुपयांच्या खड्डे दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली. त्यानंतर बांधकाम विभागाने तत्काळ स्थायी समितीसमोर विभागनिहाय रस्ते दुरुस्तीसाठीचे १०४ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले. त्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळाली आहे. महासभेने या रस्ते दुरुस्तीसाठी महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने रस्ते खोदाईच्या बदल्यात महापालिकेकडे १६० कोटी रुपये रस्ते तोडफोड फी जमा केली आहे. त्यातील १०४ कोटी रुपये खर्च करून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. दरम्यान सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरण करण्यात अडचणी असल्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती ऑक्टोबरच्या अखेरीस होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या पावसाळ्यातही नागरिकांच्या नशिबी खड्ड्यांमधील प्रवास कायम असल्यचे दिसत आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय मंजूर निधी

विभाग          मंजूर निधी (रुपये)
पश्चिम :२० कोटी ६४ लाख
सिडको : २० कोटी १० लाख
नाशिक रोड : १८ कोटी ९३ लाख
पूर्व : १४ कोटी ९० लाख
पंचवटी : १४ कोटी ५० लाख
सातपूर : १५ कोटी २३ लाख