Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अखेर महापालिकेकडून 706 पदे भरतीचा मुहूर्त जाहीर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. यामुळे टाटा कन्सल्टन्सी कंपनीकडून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जवळपास वर्षभरापासून चर्चेच्या पातळीवर असलेली नोकरभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला 'ब' वर्गाचा दर्जा मिळाल्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आला. या १४ हजार पदांच्या सुधारित आराखड्याला अद्याप सरकारने मंजुरी दिलेली नाही. तसेच नियमित रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने महसूल खर्चाची अट टाकली आहे. सरकारच्या अटीनुसार ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करता येत नाही. मात्र, कोविडकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भरती करताना सरकारने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या. महापालिकेने सरकारने दिलेल्या सूचनेनुसार आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांशी चर्चा करून टीसीएस कंपनीची भरतीसाठी निवड केली आहे. टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाल्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरीघेऊन टीसीएस समवेत करार करण्यातआला. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती केली जाणार असून एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली.