नाशिक (Nashik) : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे ३६ मीटर शिडीचे वाहन कालबाह्य झाल्याने वाहनाची नोंदणी रद्द करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. महापालिकेला ९० मीटर उंच शिडी खरेदीची टेंडर प्रक्रिया पूर्ण करता येत नसताना महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात सध्या पंधरा वर्षे जुनी झालेली कालबाह्य ३६ मीटर उंच अग्निशमन शिडीच्या वाहनाची नोंदणी रद्द करण्याची नोटीस आली आहे. यामुळे ९० मीटर शिडी खरेदी करण्यास वेळ लागणार असल्याचे सांगून महापालिकेचा अग्निशमन विभाग साडेचार कोटींचे नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे ९० मीटर उंच शिडी खरेदीच्या दप्तर दिरंगाईमुळे महापालिकेला साडेचार कोटींचा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागणार आहे.
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात सध्या पंधरा वर्षे जुनी झालेली कालबाह्य ३६ मीटर उंच अग्निशमन शिडी आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने संपूर्ण राज्यासाठी २०१९ मध्ये एकीकृत विकास नियंत्रण नियमावली लागू केल्याने शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी दिली जात आहे. या इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हायड्रोलिक शिडीची आवश्यकता लागणार असल्याने अग्निशमन विभागाने २०२१ मध्ये ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी अर्थात, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया राबवली होती. टेंडर प्रक्रिया राबवत फिनलॅण्ड येथील मे. वेसा लिफ्ट ओये या कंपनीला कार्यारंभ आदेश देत ३१ मे २०२३ पर्यंत शिडीचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने दिलेल्या मुदतीत ९० मीटर शिडीचा पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे महापालिकेने नव्याने ९० मीटर उंच शिडी खरेदीची प्रक्रिया सुरू केली. नव्या प्रक्रियेत या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मची किंमत ३१.२६ कोटींवरून वाढून ती ३८ कोटी रुपये झाली आहे.
या नव्या टेंडर प्रक्रियेत एकच कंपनी सहभागी झाल्याने गेल्या मार्चमध्ये त्या टेंडरला सात दिवस मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतर त्या टेंडरमध्ये काहीही प्रगती झाली नाही. त्यातच परिवहन कार्यालयाकडून ३६ मीटर उंचीच्या शिडीचे जुने कालबाह्य वाहनाची नोंदणी रद्द करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. नवीन ९० मीटर शिडी खरेदीचे टेंडर राबवण्यास वेळ लागेल, असे अग्निशन विभागाचे म्हणणे आहे. या विलंबामुळे अस्तित्वात असलेल्या ३६ मीटर उंचीच्या शिडीकरिता जुने वाहन खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. वास्तविक हा पर्याय हा महापालिकेला परवडणारा नाही. अग्निशमन विभागाने ९० मीटर हायड्रोलिक शेड खरेदी करण्याची टेंडर प्रक्रिया राबविल्यानंतर सहा महिन्यात शिडी प्राप्त होऊ शकते. असे असतानाही प्रथम आता वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने अग्निशमन वाहनाची मुदत संपल्याच्या नोटीशीचे निमित्त पुढे करत ही खरेदी केली जाणार आहे. अग्निशमन विभागाने ३६ मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीचे कालबाह्य झालेले वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करण्यासाठी देकार मागवले आहेत. वाहन खरेदीसाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे आधीचे टेंडर पूर्ण न झाल्याने नवीन ९० मीटर शिडीसाठी सात कोटी रुपयांचा खर्च वाढला असताना आता जुन्या शिडीसाठीही नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आणखी साडेचार लाख रुपयांचा भूर्दंड बसणार आहे.