नाशिक (Nashik) : महापालिकेने खरेदी केलेले यांत्रिकी झाडू दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर स्वच्छता विभागाकडील खासगीकरणातील ७०० सफाई कर्मचारी कमी होऊन महापालिकेवरील स्वच्छतेचा बोजा कमी होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात महापालिकेच्या घनकचरा विभागाने खासगीकरणातील स्वच्छता कर्मचारी कमी करण्याऐवजी त्या जुन्याच ठेक्याचे विस्तारीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या विभागाकडून शहरातील प्रमुख ठिकाणी सफाई कर्मचारी संख्या वाढवण्यावर भर दिला जात असल्याने आधीचा ठेका ७०० ऐवजी ९०० कर्मचाऱ्यांसाठी राबवण्याबाबत आढावा घेतला जात आहे. यामुळे यांत्रिकी खरेदीवर ३३ कोटी खर्च केल्यानंतर आता ९०० कर्मचारी नेमण्यासाठी पुन्हा १०० कोटींचे टेंडर राबवून नाशिक महापालिका काय साध्य करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत साडेपाच लाखाहून अधिक इमारती, मोकळे भूखंड व व्यावसायिक संकुले आहेत. लोकसंख्या अंदाजे २२ लाखांवर आहे. पूर्वी गोदावरीच्या दोन्ही मर्यादित असलेले नाशिक शहर आता आडगाव, मखमलाबाद, चुंचाळे, पिंपळगाव बहुला, नाशिकरोड, चेहेडी, देवळाली अशा शहरालगत असलेल्या संबंधित परिसरात विस्तारले आहे. या भागात शहरीकरण व नागरीकरणामुळे कचऱ्याचेही प्रमाण वाढले आहे. यामुळे महापालिकेने १ ऑगस्ट २०२० पासून खासगीकरणाद्वारे ठेकेदाराकडून ७०० सफाई कर्मचाऱ्यांचा माध्यमातून स्वच्छतेचे काम केले जात आहे. याबाबतचा ठेका राबवताना या कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्याचे कारण दिले गेले होते.
दरम्यान, या स्वच्छतेच्या ठेक्यावर होत असलेल्या खर्चात बचतीसाठी म्हणून महापालिकेने ३३ कोटी रुपयांच्या निधीतून चार यांत्रीक झाडू खरेदी केले गेले. यांत्रिकी झाडू आल्यानंतर ७०० सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी होऊ त्यात तीनशे ते चारशेने कपात होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात खासगी स्वच्छता कर्मचारी संख्या नऊशेपर्यंत वाढवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्मचारी संख्या वाढवली म्हणजे ठेक्याची रक्कमही वाढणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आता या स्वच्छतेच्या आधीच्या ठिकाणांमध्ये महापालिकेच्या ८४ शाळा, सर्व ८ जलतरण तलाव, महाकवी कालिदास कलामंदिर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांसह पाच ते सहा मोठे सभागृह यांची भर घालण्याचा विचार सुरू आहे. एकीकडे नागरी कामांसाठी महापालिकेची आर्थिक कामांसाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देताना स्वच्छतेसाठी आधी ३४ कोटींची यांत्रिकी झाडू खरेदी केल्यानंतर पुन्हा स्वच्छता कर्मचारीही वाढवण्याचा घाट घातला जात असल्याने यामागे केवळ ठेक्याची रक्कम वाढवण्याचा हेतु असल्याचे मानले जात आहे. या खासगीकरणातील ७०० कर्मचारी नेमण्याचा तीन वर्षापूर्वीचा ठेका ८४ कोटींचा होता. त्यात कर्मचारी वाढवल्यानंतर तो ठेका १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.