Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 2780 कोटींच्या ‘नमामि गोदा’साठी 150 कोटी आणायचे कोठून?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : गोदावरी स्वच्छता प्रदूषणमुक्त व सुशोभीकरण यासाठी प्रस्तावित केलेल्या नमामि गोदा या प्रकल्पाच्या फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केंद्रिय जलशक्ती मंत्रालय व आयआयटी रुरकीच्या निर्देशांनंतर २७८० कोटींचा सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला आहे. हा अहवाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेने राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी देणार असले तरी या प्रकल्पांसाठी महापालिकेला जागा उपलब्ध करून द्यावी लागणार असून त्या जागेच्या संपादनासाठी जवळपास १५० कोटी रुपये उभारायचे कसे, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

नाशिक महापालिकेने वाराणशी येथील नमामि गोदा प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिक येथे नमामि गोदा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडल्यानंतर केंद्रिय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपयांचा अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. दुसरीकडे, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही प्रकल्पांचा एकाच प्रकल्पाात समावेश करण्यासाठीचे  फेरसर्वेक्षण पूर्ण झाले असून नमामि गोदा प्रकल्पाची किंमत आता २७८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

नमामी गोदा प्रकल्पाअंतर्गत गोदाघाटांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या जुन्या मलवाहिन्या बदलणे व मलनिस्सारणकेंद्रांची क्षमतावाढ, आधुनिकीकरणमखमलाबाद मलनिस्सारण व कामटवाडा केंद्रनिर्मिती, नववसाहतींमध्ये सिवर लाइनचे जाळे टाकणे ही महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. त्यात कामटवाडे येथे ११ एकर व मखमलाबाद येथे ७ एकरवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ६२२ कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारण (एसटीपी) उभारले जाणार आहेत. या जागांवर महापालिकेने मागील सिंहस्थातच आरक्षण टाकले आहे. आता या भूसंपादनासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी लवकरच जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आरक्षित भूखंडाचे शासकीय मूल्यांकन केले जाईल. प्राथमिक अंदाजानुसार या दोन्ही मलनिस्सारण केंद्रांच्या जागेसाठी साधारण १५० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. कामटवाडे येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राची क्षमता प्रतिदिन ५४ दशलक्ष लिटर, तर मखमलाबाद येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राची क्षमता ४५ दशलक्ष लिटर असेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळा व शहराच्या भविष्याच्या दृष्टीने हे दोन्ही एसटीपीची वेळेत निर्मिती होणे आवश्यक आहे.