नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने देशातील वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचर्यापासून वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेने ६.८ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पातून महिन्याला एक लाख युनिट वीज तयार होईल, असे सांगण्यात आले होते. दरम्यान हा प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे वेळोवेळी बंद पडत असल्याने तसेच त्यासाठी शहरातून पुरेसा ओला कचरा मिळत नसल्याचे कारण देत महापालिकेने हा प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून आता सीएनजी तयार करता येईल का याची चाचपणी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने सुरू केली आहे.
नाशिक महापालिकेने २०१७ मध्ये विल्होळीत जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प ६.८ कोटी रुपयांच्या अनुदानातून साकारला आहे. या प्रकल्पातून पालिकेला वर्षाकाठी लाखो युनिट वीज निर्मिती होऊन वीज वापरावरील खर्चात लाखो रुपयांची बचत होणार असल्याचे जाहीर केले होते. या प्रकल्पाचे नोव्हेंबर २०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर व्यवस्थापनाची जबाबदारी पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी मक्तेदार कंपनीला दिली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक कचरा, मलजल हे बंद वाहनांमधून आणणे, प्रकल्पातील पल्पर या युनिटमध्ये लगेचच टाकून प्रक्रिया करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र, मागील सहा वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे वीज निर्मितीमध्ये विघ्न येत आहेत.
कोरोना महामारीनंतर जानेवारी २०२२ पासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न झाला. त्यातच मागील मार्चमध्ये इंजिनचा ३२ हजार रुपये किमतीचा स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने वीज निर्मिती ठप्प झाली. हे स्टार्टर फ्रान्समध्ये मागवण्याच्या काळातच कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या गॅसच्या सिलिंडरमधील सेन्सर चालत नसल्याची अडचण समोर आली. यामुळे जूनपर्यंत वीजनिर्मिती बंद होती. दरम्यान शहरात सध्या जेमतेम दीड टन ओला कचरा संकलन होत असल्याने अवघ्या पंधरा युनिट वीजनिर्मिती होत आहे. यावर पर्याय म्हणून महापालिकेने या प्रकल्पाचे बायोगॅस प्रकल्पात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नासका व टाकाऊ शेतमाल उपलब्ध होतो. दिवसाला वीस टन शेतमालावर प्रक्रिया करुन मोठ्या प्रमाणात सीएनजी गॅस तयार करणे शक्य आहे,असे महापालिकेला वाटते.
स्वच्छ शहर स्पर्धेत इंदूर देशात पहिले येते. या ठिकाणी बायोगॅस प्रकल्प पथदर्शी ठरत आहे. त्याच धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने असा प्रकल्प उभारला आहे. हे पाहून नाशिक महापालिकेने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प थांबवत आता सीएनजी प्रकल्प उभारण्याच्या मनस्थितीत आहे. त्या दृष्टीने चाचपणी करून केंद्राच्या योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळेल काय, याबाबत चाचपणी सुरू आहे.
बाजार समितीतील कचऱ्यावर नजर
नाशिक जिल्हा हा कृषी प्रधान आहे. येथील बाजार समितीमध्ये रोज हजारो टन शेतमाल विक्रीसाठी येत असतो. यावेळी बाजार समितीमध्ये मोठ्याप्रमाणावर ओला कचरा निर्माण होत असतो. त्यामुळे बायोगॅस प्रकल्पासाठी हा कचरा वापरून त्यापासून सीएनजी निर्मिती होऊ शकतो. सीएनजी प्रकल्प सुरू केल्यास त्याचा उपयोग सीटीलिंक बससह महापालिकेला होण्याची शक्यता आहे.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे सीएनजी प्रकल्पात रुपांतर केले जाणार असून त्यासाठी इंदूर येथील सीएनजी प्रकल्पाची पाहणी केली जाईल. सध्या ओला कचराच संकलित होत नसल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करता आला नाही.
- बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.