Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

टेंडर निघण्यापूर्वीच होर्डींगचा पेपर फुटला

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्वाच्या जागेवर होर्डींग लावण्याचे टेंडर (Tender) जाहीर होण्यापूर्वीच अटी व शर्थींचा पेपर सोशल मिडीयावरून बाहेर पडल्याने विशेष व्यक्तींसाठी पायघड्या घालण्याचे विविध कर विभागाचा डाव यानिमित्ताने उघड झाला. शहरात २८ ठिकाणी होर्डींग लावण्यासाठी मोठा अनुभवाच्या कंपन्यांऐवजी दहा होर्डींग्जची अट टाकून छोट्या कंपन्यांना दिली जाणारी चाल या विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ठरली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये थकबाकीदारांना सवलत देण्याबरोबरच दंडाच्या रकमेत तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे. सुधारीत अंदाजपत्रक तयार करताना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात तुट दिसून आली. त्यात विविध कर विभाग वसुलीत सर्वांत मागे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या विभागाकडून उत्पन्न वाढीसाठी मोठी अपेक्षा आहे.

त्यापार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या जागेवर २८ ठिकाणी जाहिरात होर्डींग लावण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारण अकरा हजार चौरस फूट जागेच्या माध्यमातून महापालिकेला दहा वर्षांसाठी साधारण पाच कोटी रुपयांचा महसूल कायमस्वरुपी मिळेल, अशी व्यवस्था आहे. परंतू अटी व शर्थी असलेला कागद सोशल मिडीयावर जोरदारपणे झळकत असल्याने होर्डींग टेंडरच्या या पेपर फुटीची चांगलीच चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.

थकबाकीदारांसाठी पायघड्या

पालिका हद्दीमध्ये २८ जागांवर होर्डींग लावण्यासाठी काढल्या जाणाऱ्या टेंडरमधील अटी व शर्थी काय असतील यासंदर्भातील एक कागद सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याने विविध कर विभागातील लिकेज या निमित्ताने बाहेर आहे. होर्डींग टेंडरमध्ये परफेक्ट बसण्यासाठी दहा होर्डींग महापालिका हद्दीत बसविण्याचा अनुभव असावा ही प्रमुख अट टाकण्यात आली आहे. २८ जागांवर होर्डींग बसविण्यासाठी तेवढ्याचं ताकदीची कंपनी गरजेची असताना छोट्या प्लेअरला चाल देण्यासाठी अट टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापालिका हद्दीत दहा ते पंधरा होर्डींग्ज असलेले अनेक महापालिकेचे थकबाकीदार असल्याने त्यांच्यासाठी अटी व शर्थी टाकण्यात आल्याची चर्चा होर्डींग टेंडरच्या पेपर फुटीच्या निमित्ताने होत आहे.