Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : शहरातील 1992 जुने वाडे धोकादायक; महापालिकेची पावसाळ्यापूर्वी खाली करण्याची नोटीस

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ११९२ धोकेदायक वाड्यांना नोटिसा धाडल्या असून, तात्काळ वाडे खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणच्या वाड्यांमध्ये घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद असल्यामुळे भाडेकरू जीव मुठीत धरून या धोकादायक वाड्यांमध्ये राहत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. महापालिका दरवर्षी या धोकादायक वाड्यांमध्ये राहत असलेल्या रहिवाशांना एक सोपस्कार म्हणून नोटीस देत असते. मात्र, त्यानंतरही हे वाडे खाली केले जात नाहीत. मागील वर्षी दोन वाडे कोसळले होत. सुदैवाने त्यात काहीही हानी झाली नव्हती. यामुळे यावषॅी महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

नाशिक शडरातील जुने नाशिक, पंचवटी या भागांमध्ये जुन्या वाड्यांची संख्या मोठी आहे. हे वाडे जुने झाले असून अनेक ठिकाणी वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे भाडेकरू राहत असून त्यांना जुन्या दराने भाडे आकारणी केली जाते. हे भाडेकरून घर खाली करीत नसल्यामुळे या भाडेकरूंपासून अल्पउत्पन्न मिळत असल्याने वाड्याचे मालक या जुन्या वाड्यांची देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे हे जुने वाडे धोकादायक बनले असून  पावसाळ्यात हे धोकादायक वाडे कोसळण्याची भीती असते. वाडे कोसळून होणारे नुकसान व  जीवितहानी टाळण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून पावसाळ्यापूर्वी नोटिस दिली जाते. यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. जुने वाडे, धोकादायक घरांमध्ये राहत असलेल्या रहिवाशांनी त्या वास्तू खाली करण्याच्या सूचना नोटीशीमध्ये देण्यात आल्या आहेत.

मात्र, अनेक वर्षांपासून या घरांमध्ये राहत असल्यामुळे त्या घराचा मालकी हक्क मिळेल या आशेने भाडेकरू घर सोडण्यास तयार नाही. या उलट वाडा कोसळल्यावर भाडेकरू स्वतःहून जातील, यामुळे घरमालक वाडे कोसळण्याची वाट बघत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या दोघांच्या वादामुळे वाडे खाली करण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान या धोकेदायक वाड्यांमधील रहिवाशांनी ते वाडे, घरे खाली न केल्याचे त्यांचे नळ व वीज जोडणी तोडण्याचा इशाराही या नोटीशीत देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील सर्वाधिक धोकादायक असलेल्या काझीगढी या परिसरातील १५२ रहिवाशांवर संकटाचे मोठे सावट आहे. सर्वाधिक धोकेदायक घरे, इमारती वाडे नाशिक पश्चिम विभागात आहे. महापालिका केवळ नोटीशीचे सोपस्कार पूर्ण करणार की, या भाडेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी काही प्रयत्न करणार हे प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.