Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : विकासकामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडे अवघे तीन महिने

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता लागू झाली. दोन्ही आचारसंहिता शुक्रवारी (ता.५) संपुष्टात आल्याने ६ जुलैपासून महापालिकेचे कामकाज सुरळीत होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने त्यापूर्वी म्हणजे विकासकामे मार्गी लावण्यासाठी आता महापालिकेकडे अवघे तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चला निवडणूक जाहीर करण्यात आली. त्याच दिवसापासून आचारसंहितादेखील लागू झाली. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यात नाशिकमध्ये चौथ्या टप्प्यात निवडणूक पार पडली. ४ जूनला मतमोजणी होती, मतमोजणीनंतर आचारसंहिता संपुष्टात येणे अपेक्षित होते. परंतु २३ मेस विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे दुसरी आचारसंहिता लागू झाली. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांसाठी पुढे ढकलली. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच पुन्हा नव्याने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली.

१ जुलैला मतमोजणी व ५ जुलैला आचारसंहिता संपणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार लोकसभा पाठोपाठ शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपुष्टात येणार असल्याने महापालिकेच्या कामकाजाला गती येणार आहे. मागील अडीच महिन्यापासून आचारसंहिता असल्याने नवीन कामांच्या निविदा प्रक्रिया काढता येत नव्हत्या. महापालिकेने अत्यावश्यक या कामांची यादी तयार करून राज्य सरकारच्या सुकाणू समितीकडे मंजुरीसाठी पाठविली होती, मात्र आचारसंहितेचे कारण देत फेटाळण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा गाढा आचारसंहितेत रुतला होता. परंतु आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने वेगाने कामाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे

सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली कामे येत्या तीन महिन्यात मार्गी लावणे महापालिकेला गरजेचे आहे. त्याचबरोबर महसूल वसुलीचे उद्दिष्टदेखील पूर्ण करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जानेवारीत महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे असल्याने महापालिकेच्या प्रशासनाला येत्या तीन महिन्यात विकासकामे मार्गी लावण्याची संधी आहे.