Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : वादग्रस्त सफाई ठेक्याला दुसऱ्यांदा मुदतवाढ; टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शहराची दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या वादग्रस्त वॉटरग्रेस ठेक्याला प्रशासनाकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ जुलैस दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ ३१ ऑक्टोबरला संपली आहे. या वाढीव मुदतीतही स्वच्छतेचे नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या ठेक्याला पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली असून आता जानेवारी २०२३ पर्यत शहरातील स्वच्छतेचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून केले जाणार असून त्यासाठी सात कोटी रुपये खर्च होणार आहे.

नाशिक महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला शहर स्वच्छतेसाठीचा तीन वर्षांचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. या कंपनीचा ठेका सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला आहे. मागील वर्षी कंपनीने ऐन दिवाळीत चारशे कामगारांना कामावरून कमी केले होते. त्यावरून मोठा वाद उद्भवला होता. याशिवाय कामगारांचे वेतन थकवणे, ठरल्यापेक्षा कमी वेतन देणे, कर्मचाऱ्यांना मुलभूत सुविधा न देणे अशा अनेक तक्रारी संबंधित कामगारांनी केल्या आहेत. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्याबाबत काहीही कारवाई न केल्याने विभागाकडून ठेकेदारास पाठीशी घातले जात असल्याचेही आरोप झाले होते. कामात अनियमिततेच्या तक्रारी असतानाही महापालिकेच्या चौकशीत सबंधित ठेकेदाराला क्लीन चीट देण्यात आलेली आहे.

या कंपनीला महापालिका एका दिवसासाठी ७ लाख १९ हजार रुपये देते. या कंपनीच्या ठेक्याची मुदत यावर्षी जुलैमध्ये संपण्यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापन विभागाने टेंडर प्रक्रिया राबवून नवीन कंपनीला कार्यारंभ आदेश देणे अपेक्षित होते. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाने याबाबत काहीही कार्यवाही केली नाही व नवीन टेंडर राबवले नसल्याने जुलैमध्ये या कंपनील तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.  य मुदतवाढीचा कालावधी येत्या ३१ ऑक्टोबर होता. मात्र, त्या काळाताही टेंडर राबवले नाही. महापालिकेत जुन्या ठेकेदार कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी वेळेत टेंडर प्रक्रिया राबवायची नाही. टेंडर प्रक्रिया सुरू केली तरी किमान सहा महिने त्यावर कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असे प्रकार सर्रास केले जात असल्याचे प्रत्येक कामाच्या बाबतीत दिसून येत असते.  विद्यमान आयुक्तांनी त्यात बदल करण्याच्या सूचना देऊनही कार्यपद्धतीमध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाही. आताही स्वच्छतेबाबत नवीन टेंडर प्रक्रियेची तयारी सुरू असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. वाद्रग्रस्त ठरलेल्या या ठेकेदारावर एका दिवसासाठी सात लाख १९ हजार  रुपये मोजले जाणार आहे. शहरात या कंपनीच्या सातशे कर्मचाऱ्याकडून पश्चिम व पंचवटी विभागात स्वच्छतेचे काम करून घेतले जाते.