Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशकातही आता नमामी गोदा! साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : गोदाकाठचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी नमामी गोदा हा 1800 कोटींचा प्रकल्प राबवला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी गुजरातमधील साबरमती रिव्हर फ्रंट या प्रकल्पाच्या आराखड्याचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेचे पथक अहमदाबाद येथे पाठवले जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नमामी गोदा प्रकल्पाचा आढावा घेताना हा निर्णय घेतला आहे.

नाशिक हे कुंभ मेळ्याचे ठिकाण असून, 2015 च्या कुंभ मेळ्यात गोदावरी प्रदूषण हा मुद्दा समोर आला होता. प्रदूषित गोदावरीमध्ये शाहीस्नान करण्यास आखड्यांच्या साधू महंतांनी नकार दिल्यानंतर तसेच हरित लवादाच्या आदेशानुसार त्यावेळी महापालिका प्रशासनाने गोदावरीमध्ये सोडण्यात आलेले सांडपाण्याचे नाले तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे सध्या गोदावरीचे प्रदूषण वाढून पानवेली वाढल्या आहेत.

दरम्यान, नमामी गंगा या प्रकल्पाच्या धर्तीवर नमामी गोदा हा प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारने 1800 कोटी रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रमुख समस्यांचा अभ्यास केला त्यात गोदावरी प्रदूषण व सुशोभीकरण या समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी नमामी गोदा या प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. यात त्यांनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर 'नमामी गोदा' प्रकल्पाअंतर्गत प्रयत्न करण्याचे सूतोवाच केले. त्यासाठी आयुक्तांनी साबरमती रिव्हर फ्रंटचा विकास आराखडा मागवला असून, अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

डॉ. पुलकुंडवार साबरमती रिव्हर फ्रंट प्रकल्पाच्या विकास आराखड्याचा अभ्यास करणार आहे. तसेच अभ्यास दौयासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक पाठवणार आहेत. गरज पडल्यास स्वतःआयुक्तदेखील पाहणी करणार आहेत. नमामी गोदा प्रकल्प राबवताना साबरमती रिव्हर फ्रंट हा प्रकल्प डोळ्यासमोर ठेवला जाणार आहे. त्यानुसार गोदावरी स्वच्छता, सुशोभीकरण, लेझर शो, उद्यान, गंगा आरती, मनोरंजन आदी गोष्टीचा या प्रकल्पात समावेश असणार आहे.