नाशिक (Nashik) : शहराची २०४१ मधील लोकसंख्या गृहित धरून शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था उभारण्याचे नियोजन सध्या नाशिक महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात पाणी पुरवठा व्यवस्था उभारण्याच्या कामांचा समावेश केला जात आहे.
मुकणे धरणातून २०४१ पर्यंत पिण्यासाठी जवळपास पावणेसहा टीएमसी पाणी उचलायचे असून त्यासाठी विल्होळी नाका येथे १३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्रप्रस्तावित केले जाणार आहे. आधीच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १३७ दशलक्ष लिटर असल्यामुळे २०३९ च्या सिंहस्थपर्यंत मुकणेतून दरवर्षी साडेतीन टीएमसी पाणी शुद्धीकरण क्षमता उपलब्ध होऊ शकणार आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या सध्या जवळपास २० लाख असून त्यासाठी शहराला गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वाडीव-हेजवळ असलेल्या मुकणे धरणातून १८ किलो मीटर लांबीची व जवळपास १८०० मिलिमीटर) व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मुकणे धरणाची क्षमता सात टीएमसी असून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार या धरणातून २०४१ पर्यंत साडेपाच टीएमसी पाणी टप्प्याटप्प्याने पिण्यासाठी उचलता येणार आहे. या करारानुसार २०३१ पर्यंत २.४ टीएमसी पाणी उचलता येणार आहे.
सध्या मुकणे धरणातून उचललेले पाणी शुद्धीकरण केंद्राची दिवसाची क्षमता १३७ दशलक्ष लिटर आहे. म्हणजे महापालिका या केंद्रातून वर्षाला १.७ टीएमसी पाणी शुद्ध करीत आहे. वाढती लोकसंख्या व पाणी उचलण्याची वाढीव परवानगी याचा विचार करता २०३१ पर्यंत सध्याचे जलशुद्धीकरण केंद्र अपुरे पडणार आहे. किमान २०३५ च्या लोकसंख्येला पुरेसे होईल, अशी शुद्धीकरण व्यवस्था उभारण्याचे नियोजन महापालिका पाणी पुरवठा विभागाने केले असून त्यासाठी आणखी दरदिवशी १३५ दश लक्ष लिटर पाणी शुद्धीकरण होईल, असे केंद्र उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे. हे केंद्र उभारल्यानंतर महापालिका मुकणेतून दरवर्षी जवळपास साडेतीन टीएमसी पाणी उचलू शकणार आहे.
सध्या विल्होळी येथे महापालिकेच्या जागेत १३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पूर्व विभागात पुरवठा केला जातो. विशेष करून पाथर्डी फाटा परिसर, इंदिरानगर तसेच, वडाळा गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. परंतु या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. मुंबईला ये जा करणे सहज सोपे असल्याने अनेकांचा या भागात वास्तव्याकडे कल आहे. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प या भागात उभारले जातआहे.
येत्या काळात तीस मजल्याचे टॉवर या भागात प्रस्तावित आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा अधिक करावा लागेल. वर्षागणिक मुकणे धरणात नाशिकसाठी पाणी आरक्षणात वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विल्होळी नाका येथे १३५ दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आवश्यक राहणार आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने पाणीपुरवठा विभागाकडून हा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून केंद्र उभारले जाणार आहे.