नाशिक (Nashik) : महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नमामि गोदा या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने अलमोंडझ या कंपनीची सल्लागारपदी नियुक्ती केलेली आहे. या कंपनीने ०.९६ टक्के या दराने आराखडा तयार करणे व केंद्र सरकारकडून मंजूर करून आणण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पाचा आराखडा साधारपणे १८२३ कोटी रुपयांचा असून तो तयार करण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च येणार आहे.
दरम्यान सल्लागार कंपनीने नमामि गोदा प्रकल्पाचा आराखडा व सविस्ती प्रकल्प अहवाल सहा महिन्यात तयार करून सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. तसेच हा आराखडा तयार करण्यापूर्वी अहमदाबा येथील साबरमती रिव्हर फ्रंट, तसेच वाराणसीचा व प्रयागराज येथील नमामि गंगा प्रकल्प बघण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या सल्लागार संस्थेला दिल्या आहेत. नदी स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी या तिन्ही ठिकाणी असलेल्या सर्वेात्तम बाबी नमामि गोदा या प्रकल्पात असाव्यात, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केलेी आहे.
नाशिक महापालिकेतर्फे "नमामि गंगा' या प्रकल्पाच्या धर्तीवर नमामी गोदा हा प्रकल्प राबवला जाणार आहे. याकरिता केंद्र सरकारने १८२३ कोटींचा निधी देण्यासाठी तत्वता मान्यता दिली असून त्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाचा आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात अलमोंडझ या कंपनीने ०.९६ टक्के या दराने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला केंद्राची मान्यता मिळवण्याची तयारी दर्शवली असल्याने महापालिकेने या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
महापालिका आयुक्तांनी या या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करताना महापालिकेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षाही स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार आराखडा तयार करण्यापूर्वी संबंधित सल्लागार संस्थेने अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंट, वाराणशी व प्रयागराज येथील नमामि गंगा या प्रकल्पांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादेशातील या तीन ठिकाणच्या नदी स्वच्छता व सुशोभीकरणाच्या या प्रकल्पांच्या ठिकाणी असलेल्या सर्वेात्तम बाबींचा नमामि गोदा या प्रकल्पात समावेश करण्याच्या सूचना या संस्थेला दिल्याची माहिती डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्याचप्रमाणे आराखडा तयार करताना गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य राहणार असून नाशिकच्या गंगाघाटावरील सर्व प्राचीन वारसा स्थळांना हात न लावता सुशोभीकरणाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संस्थेचे अधिकारी साबरमती व गंगा नदीवरील स्वच्छता व सौंदर्यीकरण प्रकल्पांची पाहणी करताना त्यांच्या सोबत महापालिकेचे अभियंतेही उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी महा महिन्यांची मुदत असली, तरी तीन महिन्यांमध्ये आराखडा तयार होऊ शकतो, असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
नमामी गोदा प्रकल्पाकरिता सल्लागाराची नेमणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संबंधित कंपनीला आराखडा तयार करण्यापूर्वी साबरमती, वाराणसी, प्रयागराज या ठिकाणांना भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त