Eknath Shinde Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याकडून निधी वाटपात दुजाभाव! कोणी केला आरोप?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या महासभने ठराविक प्रभागांमधील २६ कोटी रुपयांच्या ५७ कामांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हा निधी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या नगरविकास विभागाचा असून त्यांनी केवळ त्यांच्याच पक्षाच्या ११ माजी नगरसेवकांना निधी दिला आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक याबाबत उघडपणे बोलण्यास तयार नसले, तरी ठाकरे गटाने या ठराविक प्रभागांमध्ये निधी वाटपाला हरकत घेतली असून नाशिकच्या जनतेशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

नाशिक महापालिकेच्या महासभेत अकरा नगरसेवकांच्या प्रभागात सुमारे २६ कोटी रूपये खर्चाच्या ५७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नगरविकास विभागाने शिंदे गटाच्या ११ माजी नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामांसाठी हा निधी दिला आहे.

नाशिक महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ११ माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. या माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात कामासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात आलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी दोन कोटी रुपये याप्रमाणे २६ कोटी रुपयांचा विशेष निधी नगरविकास खात्याकडून मंजूर केला होता. हा निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला होता. या निधीतून नगरसेवकांच्या प्रभागात कोणती कामे घ्यायची याबाबत कामांचे प्रस्तावही तयार करण्यात आले होते. मात्र, महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्या कारणाने गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव रखडला होता.

अखेर गुरुवारी (दि. १०) आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत नगरसेवकांच्या प्रभागातील ५७ कामांना थेट मंजुरी देण्यात आली. त्यातमूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष निधीची तरतूद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भाजपकडूनही यादी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून नाशिकमधील शिंदे गटाच्या अकरा माजी नगरसेवकांना २६ कोटी रुपये निधी दिल्यानंतर नाशिक शहर भाजपकडूनही त्यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे समजते. या यादीतील किती कामांना मुख्यमंत्री मंजुरी देणार हे येत्या काळात दिसणार आहे.

या प्रभागांमधील कामांना मंजुरी
नाशिक महापाकिलेच्या प्रभाग क्रमांक ३, ७, १९, २१, २४, २५, २६, ३१ या प्रभागांत ५७ कामे मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर कामांमध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, उद्यान विकसित करणे, उद्यानांमध्ये खेळणी बसवणे, हायमास्ट लावणे, उद्यानाला संरक्षण भिंत, रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, अस्तरीकरण करणे, बाकडे बसवणे, मंदिराची देखभाल दुरुस्ती करणे, सभामंडप बांधणे, भूमिगत केबल टाकणे, आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.