Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: जलजीवनच्या 'त्या' ठेकेदारांना दणका; कोट्यवधींची देयके परत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असून, ठेकेदाराकडून (Contractor) देयके सादर केली जात आहेत. मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तपासणी न करताच देयक तयार करून ते मंजुरीसाठी पुढे पाठवली जात आहेत.

तसे करताना जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ॲपमध्ये झालेल्या कामांचे फोटो अपलोड करण्याकडे सर्रास दुर्लक्ष झाले. यामुळे प्रकल्प संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ॲपवर फोटो अपलोड केल्याशिवाय देयके मंजूर न करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शेकडो देयके थांबली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता ठेकेदारांची फोटो अपलोड करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

जलजीवन मिशन अतंर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून 1222 कामे सुरू आहेत. कामे वेळेत पूर्ण करण्याचा दबाव असल्याने त्याचा गैरफायदा ठेकेदारांनी उठवू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरींग मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.

या ॲपसाठी कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता, उपअभियंता यांना तपासणीसाठी लॉगिन देण्यात आले आहेत. कनिष्ठ अभियंता आणि योजनेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार यांना या प्रणालीमध्ये संबंधित पाणीपुरवठा योजनेचे व्हिडिओ, फोटो तारखेनुसार अपलोड करावी, अशी सूचना मित्तल यांनी दिल्या होत्या. तसेच कामांची देयके सादर झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांने फोटो अपलोड करणे बंधनकारक केले होते. देयक सादर करताना ठेकेदारांनी झालेल्या कामांचे फोटो त्यात अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

अक्षांश-रेखांशासह फोटो अपलोड होत असल्याने ठेकेदारांना चुकीचे फोटो टाकता येत नाहीत. मात्र, ठेकेदारांकडून फोटो अपलोड न करता थेट देयके सादर झाली. मात्र, त्यातून कामांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, काम किती पूर्ण झाले याचा उलगडा होत नाही. तसेच ॲपवर फोटो का अपलोड केली नाहीत, याचा संशय आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही सर्व देयके रोखली आहेत. तसेच1 फोटो अपलोड केल्याशिवाय त्या फायली पाठवू नयेत, अशा सूचना विभागाला दिल्या आहेत. साधारण 100 हून अधिक कामांच्या फायली परत गेल्या आहेत.

मार्च अखेरीस ठेकेदारांनी देयके सादर करूनही ती वेळेत तयार न झाल्याने 31 मार्चला 84 कोटी रुपये परत गेले होते. तेव्हापासून ठेकेदार निधी येण्याची वाट पाहत होते. मागील आठवड्यात निधी आल्यानंतर आता देयके सादर होत असताना विभागाने त्यांची तपासणी न करताच ती मंजुरीसाठी सादर केली. ती देयके नाकारण्यात आल्याने आता फोटो अपलोड होईपर्यंत देयके लांबणीवर पडली आहेत.