नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी ५६ किलोमीटरचे दोन रिंगरोड उभारणे प्रस्तावित करण्यात आले असून त्याला सिंहस्थ परिक्रमा असे नाव देण्यात आले आहे. या दोन्ही रिंगरोडचा सर्वे करण्यासाठी नियुक्त केलेल्या मोनार्क सल्लागार संस्थेने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येणार असल्याने त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. या महामार्गासाठी साधारण दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर उभारण्यात येणार आहे.
सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहराबाहेरून उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आलेल्या सिंहस्थ परिक्रमा मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात रिंगरोडचा आढावा घेण्यात आला. सिंहस्थ परिक्रमा मार्ग दोन टप्प्यात मिळून ५६ किलोमीटर असणार आहे. नाशिक महापालिकेने हा रिंगरोड तयार करण्याची तयारी दाखविली होती व त्यासाठी सरकारकडून निधीची मागणीही केली होती. मात्र, सरकारकडून निधी देण्याऐवजी शासनाकडून स्वयंत्रणेकडूनच रस्ता तयार करता येवू शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंहस्थ परिक्रमा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. रस्ते विकास महामंडळाने पुणे येथील मोनार्क या सल्लागार संस्थेची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली. संस्थेने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याचा आढावा पालकमंत्री भुसे यांनी घेतला. महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगररचनाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, संदेश शिंदे उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ३६ मीटर तसेच ६० मीटरच्या डिपीरोडचे सादरीकरण करण्यात आले.
असा आहे ३६ मीटर रुंदीचा रिंगरोड
आडगाव ट्रक टर्मिनससमोरून ३६ मीटर रिंगरोडची सुरुवात होईल. पुढे आडगाव, म्हसरुळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर - बारदान फाटा - गंगापूररोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा - सातपूर एमआयडीसीच्या पश्चिम हद्दी- त्र्यंबकरोड- नंदिनी नदी ओलांडून अंबड एमआयडीसी- गरवारे रेस्ट हाउस- मुंबई- आग्रा महामार्ग
असा आहे ६० मीटर रुंदीचा रिंगरोड
मुंबई-आग्रा महामार्गा-खत प्रकल्प येथून- पाथर्डी शिवार- पिंपळगाव खांब शिवार- वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवार- नाशिक-पुणे महामार्ग- पंचक- गोदावरी नदी- माडसांगवी शिवार -छत्रपती संभाजीनगररोड ओलांडून आडगाव शिवार-ट्रक टर्मिनस-मुंबई-आग्रा महामार्ग