Samruddhi Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 'समृद्धी' लगतच्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी! MSRDCने देणार 49 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) उपरस्त्यांसाठी अखेरीस महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) निधी दिला आहे. यामुळे 'समृद्धी' लगतच्या उपरस्त्यांची दुरवस्था संपणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्यांची दुरवस्था झाली होती. यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील आमदारांनीही हा प्रश्न लावून धरला होता.

अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निधी दिला आहे. यातून समृद्धीच्या टप्प्या क्रमांक १२ व १३ मधील कोपरगाव व सिन्नर तालुक्याला अनुक्रमे ५२ व ४९ कोटी रुपये निधी मिळाला आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी झाल्यास शेतात जाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे.
   

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेला नागपूर - मुंबई हा समृद्धी महामार्ग उभारताना त्याची उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यासाठी गौणखनिजाची मोठ्याप्रमाणवर वाहतूक केली आहे. यामुळे समृद्धीला जोडलेले असलेल्या रस्त्यांची मोठी वाताहत झाली आहे. त्याचप्रमाणे समृद्धी लगत शेत असलेल्या शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी उपरस्ते उभारून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नादुरुस्त रस्त्यांची उभारणी करणे तसेच उपरस्ते तयार करून देण्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे वेळोवेळी याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नादुरुस्त रस्त्यांबाबत अहवाल तयार केला होता. त्यानुसार सिन्नर तालुक्यात ५२ गावांमधील रस्त्यांचे या अवजड वाहनांमुळे १० कोटींचे नुकसान झाले असून, इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांचेही जवळपास पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये निधी लागणार आहे.

या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आग्रह धरल्यानंतर अखेरीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दरम्यान समृद्धी लगतच्या उपरस्त्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. पावसाळ्यात शेतापर्यंत पोहोचणे अवघड होत आहे. यामुळे अखेरीस रस्ते विकास महामंडळाने या उपरस्त्यांसाठी निधी दिला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्याला ५२ कोटी रुपये व सिन्नर तालुक्यातील समृद्धीच्या उपरस्त्यांसाठी ४९ कोटी रुपये निधी मिळाला आहे.

सिन्नर व कोपरगाव तालुक्याच्या हद्दीवरील गावांमध्ये उपरस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला होता. शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मार्गच नव्हता. या प्रश्नी सर्व प्रथम सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी लक्ष वेधले होते. त्यासाठी सायाळे हद्दीत सर्व प्रथम समृद्धी महामार्ग अडवला होता. त्यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सेवा मार्गाबाबत सर्व प्रथम आश्वासन दिले होते.

अद्यापही या मार्गामुळे नैसर्गिक प्रवाह अडवले गेले असून, त्यांना मार्ग काढून देण्याचे काम महामंडळाने केलेलं नाही. यामुळे या नैसर्गिक प्रवाहांमधील पाण्याचा निचरा होण्यासाठीही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना करावी, अशी प्रकल्पबाधितांची मागणी आहे.