Dadasaheb Phalke Memorial Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज; 'या' ठिकाणी उभी राहणार फिल्मसिटी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक नाशिकचे असल्यामुळे महापालिकेने दादासाहेब फाळके स्मारक (Dadasaheb Phalke Smarak) उभारलेले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षामुळे या स्मारकाची रया गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या (Ramoji Film City) धर्तीवर विकास केला जाणार असून, त्यासंदर्भात महापालिकेने मागील आठवड्यात स्वारस्य देकार मागवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून चित्रनगरीच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची मागणी पत्रान्वये करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क व बाह्यवळण रस्त्यांवर ट्रक टर्मिनस योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचा अंदाजपत्रकात समावेश केला आहे. त्याचबरोबर पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठीदेखील तातडीने पावले उचलण्यात आली आहेत.

पाथर्डी शिवारात १९९९ मध्ये उभारलेल्या पांडव लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक तयार करण्यात आले. स्मारकाची देखभाल व दुरुस्ती खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर दुरवस्था सुरू झाली. मागील वर्षी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रकात योजनेचा समावेश केला.

पुनर्विकासासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासगीकरणातून विकास करण्यास विरोध केल्यानंतर स्वनिधीतून प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याबाबत काहीही हालचाल झाली नाही.

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतेच सादर केलेल्या अंदाजपत्रकात रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी बांधकाम विभागाकडून स्वारस्य देकार मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान फाळके स्मारकाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे ५० कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. या संदर्भातील पत्र एमटीडीसीकडे पाठवण्यात आले असून फिल्मसिटीच्या धर्तीवर सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.