Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

NMC: बांधकाम विभागाचा प्रताप; रद्द उड्डाणपुलांसाठी 10 कोटी तरतूद

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिका प्रशासनाकडून मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल रद्द केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात दोन्ही पुलांसाठी मिळून ९ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींकडून विरोध असलेल्या व आयआयटी पवई सारख्या संस्थेने पुलाची गरज नसल्याचे स्पष्ट केले असतानाही महापालिकेच्या बांधकाम विभागाला या पुलामध्ये एवढे स्वारस्य का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच बांधकाम विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक महापालिकेने सातपूर रस्त्यावरील मायको सर्कल येथील उड्डाणपुलासाठी १३२ कोटी ६८ लाख रुपये, तर त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी १२३ कोटी ५४ लाख रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवली होती. दोन्ही कामे एकाच कंत्राटदाराला देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी कार्यारंभ आदेशही दिले होते.

दरम्यान कोणत्याही ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्याआधी तेथील वाहतूक सर्वेक्षण करणे गरजेचे असते. मात्र, या दोन्ही उड्डाणपुलांबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोणतेही सर्वेक्षण केले नाही. तसेच विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून टेंडर प्रक्रिया राबविण्याचा आरोप झाला. सिमेंटच्या दर्जाची प्रतवारी वाढविण्याच्या नावाखाली ४४ कोटी रुपये किमत वाढवण्यात आली. पुलाच्या कामाचे दर वाढवण्यासाठी स्टार रेट लावण्यात आल्याचा आरोप झाल्याने हे दोन्ही उड्डाणपूल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

त्याचप्रमाणे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही उड्डाणपूल रद्द करण्याचे तोंडी आदेश आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची गरज तपासण्यासाठी आयआयटी पवईला ट्रॅफिक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी पवईने जुलै २०२२ मध्ये उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिला. त्यानुसार उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हे वादग्रस्त पूल रद्द झाल्याचे मानले जात होते.

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कार्यारंभ आदेश रद्द करण्याची कार्यवाही सुरू असतानाच जानेवारी २०२३ मध्ये संबंधित ठेकेदार कंपनीने बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून नवीन तंत्रज्ञानानुसार दोन्ही पूल दर्जेदार करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार काम करण्याचीदेखील तयारी दाखवली. यामुळे बांधकाम विभागाबाबत पुन्हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी बांधकाम विभागाने आम्ही करीत असलेला पत्रव्यवहार हा कार्यारंभ आदेश रद्द करण्यासाठी सुरू असल्याचा खुलासा केला होता.

दरम्यान महापालिकेने नुकतेच सादर केलेल्या २०२३ - २४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मायको सर्कल येथील उड्डाणपुलासाठी चार कोटी ७५ लाख, तर त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला या दोन्ही उड्डाणपुलांमध्ये रस असल्याचे समोर आले आहे.

मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल रद्द करण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मायको सर्कल उड्डाणपुलासाठी वर्कऑर्डर दिले नव्हते. त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी मात्र ऑर्डर होती. पुलाचे काम अद्याप रद्द झालेले नाही. यामुळे अंदाजपत्रकात नाममात्र तरतूद करण्यात आल्याचा खुलासा बांधकाम विभागाने केला आहे.