Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पंचवटी, पूर्व, नाशिकरोडच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याला चौथ्यांदा का मिळाली मुदतवाढ?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाकडून नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्व या तिन्ही विभागांसाठी १९ कोटींच्या टेंडरसाठी (Tender) नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे. याआधीची टेंडर प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्द ठरवत नवीन टेंडर राबवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मलेरिया विभाग पुढील तीन महिन्यांमध्ये नवीन टेंडर राबवणार आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्व या विभागांसाठी पेस्ट कंट्रोलची टेंडर प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने जुन्याच ठेक्याला चौथ्यांदा वाढ द्यावी लागली आहे.

नाशिक महापालिकेने संपूर्ण शहरासाठी दिलेला पेस्ट कंट्रोलचा ठेका ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर महापालिकेच्या मलेरिया नियंत्रण विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात आधीच्या १८ कोटींच्या ठेक्याची किंमत ४६ कोटींवर पोहोचली होती.

याबाबत ओरड झाल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी टेंडर प्रक्रिया रद्द करून फेरटेंडर प्रसिद्ध केले. या टेंडरमध्ये सहभागी असलेल्या मेसर्स दिग्विजय एंटरप्राइजेसने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने महापालिकेच्या फेरटेंडर विरोधात निकाल दिला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यातील अनावश्यक कामांना कात्री लावून ४६ कोटींचा ठेका ३३ कोटी रुपयांपर्यंत खाली आणला.

त्यातही सिडको, नाशिक पश्चिम व सातपूर विभागासाठी एक, तर नाशिक रोड पूर्व व पंचवटी विभागासाठी एक असे दोन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिडको, सातपूरसाठी एसआर पेस्ट कंट्रोल, तर पूर्व व पंचवटी विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले. मात्र, ठेका न मिळालेल्या सूरज एंटरप्राइजेसने एआर पेस्टकंट्रोलमार्फत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना उच्च न्यायालयात आव्हान दिले.

टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पंचवटी, नाशिक पूर्व व नाशिकरोड या तीन विभागांमधील भागातील पेस्ट कंट्रोलच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. उच्च न्यायालयाने जूनमध्ये स्थगिती दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये टेंडर प्रक्रियाच रद्द केली आहे. यामुळे मलेरिया नियंत्रण विभाग नवीन टेंडर राबवणार असून तोपर्यंत जुन्याच टेंडरला चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यामुळे नवीन ठेकेदार नेमणूक होईपर्यंत दिग्विजय एंटरप्रायजेस पेस्ट कंट्रोलचे काम करणार आहे.