Chagan Bhujbal Tendernama
उत्तर महाराष्ट्र

एअरबस प्रकल्प नाशिकला होण्यासाठी भुजबळांनी टाटांना पाठविलेले पत्र

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : देशाच्या संरक्षण मंत्रालयासाठी एअर बस निर्मितीचे २२ हजार कोटींचे कंत्राट टाटा उद्योग समूहाला मिळाल्याबद्दल नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले होते. तसेच त्यांनी या एअर बसचा प्रकल्प ओझर येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड यांच्याशी जॉइंट व्हेंचर करून सुरू करावा, अशी विनंती केली होती. तसेच यासाठी एचएएलच्या पायाभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग होईल, असेही पत्रात नमूद केले होते.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी केलेला एखादा पत्रव्यवहार दाखवावा, असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर म्हणून माजीमंत्री छगन भुजबळ यांनी रतन टाटा यांना ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाठवलेले पत्र उघड केले आहे. दरम्यान हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यामुळे राज्यातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयासाठी एअर बसचा प्रकल्प टाटा उद्योग समूहातर्फे गुजरातमध्ये उभारला जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नुकतेच वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर सरकारवर टीका झाली होती. त्यानंतर हा दुसरा प्रकल्पही गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारने २२ हजार कोटींचा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून एखादे पत्र दिले असेल, तर दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्यावर माजीमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे येथील तरुणांचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना २०२१ मध्ये पाठवलेले पत्र जाहीर केले आहे.

या पत्रात त्यांनी रतन टाटा यांनी एअरबस प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील एचएएल यांच्याशी जॉइंट व्हेंचरमध्ये करावा, अशी विनंती केलेली आहे. भुजबळ म्हणाले, मागील वषी संरक्षण मंत्रालयाने २२ हजार कोटींचा एअरबस प्रकल्प उभारण्याबाबत टाटा उद्योग समूहाशी करार केल्यानंतर लगेचच ३१ ऑक्टोबरला रतन टाटा यांना पत्र पाठवले होते. ओझर येथील एचएएलशी जॉंइंट व्हेंचर करून हा प्रकल्प उभारल्यास त्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याचेही आश्‍वासन पत्रात दिले होते. अनेक प्रकल्पांबाबत महाराष्ट्राला डावलले जात असल्याचा आरोप करीत ही बाब चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत आपले वजन वापरावे, असे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाचे नेते असून त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये, असेही भुजबळ म्हणाले.