नाशिक (Nashik) : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करीत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मजुरांचे आठ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकले आहेत. रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नाही. यामुळे या मजुरांना ऐन सणासुदीच्या काळात उधार-उसणवार करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, राज्यातील रोजगार हमी मजुरांचे १७५ कोटी रुपये थकले असल्याचे समोर आले आहे.
मजुरांना वर्षातील किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला असून त्यात मजुरांची ऑनलाईन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते.
ही रक्कम केंद्र सरकार थेट जमा करीत असते. रेल्वेच्या संकेतस्थळानंतर रोजा अपडेप होणारे रोजगार हमी विभाागाचे संकेतस्थळ आहे. या संकतेस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असते. तसेच रोजगार हमी मजुरांचे पैसे कधीही थांबवले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे.
दरम्यान मागील सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केले नाही. सुरवातीला संकेतस्थळावर काही समस्या असेल, अस गृहित धरले गेले. मात्र, आता दोन महिने उलटूनही मजुरांच्या खात्यात रक्कम वर्ग होत नसल्याने मजुरांना सणासुदीच्या काळात उधारउसणवार करावी लागत आहे.
रोजगार हमीवर इतर रोजंदारीच्या कामांपेक्षा कमी रक्कम मिळत असते, मात्र, वर्षभर काम तसेच प्रत्येक आठवड्याला मिळणारी मजुरी यामुळे मजूर रोजगार हमीला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता दोन महिन्यांपासून रक्कम थकल्याने रोजगार हमी योजनेविषयी असलेल्या विश्वासाला तडा जात आहे.
अकुशल मजुरांच्या कामांची रक्कम केंद्र सरकारकडून जमा होत असल्यामुळे रोजगार हमीच्या कामांचे नियमन करीत असलेल्या जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही याबाबत काहीही माहिती नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या कामांचे पाच कोटी रुपये व उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्य माध्यमातून केल्या जात असलेल्या कामांचे तीन कोटी रुपये, असे नाशिक जिल्ह्यातील सर्व रोजगार हमीच्या कामांवर काम करणाऱ्या सर्व मजुरांचे आठ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकले आहेत.
यामुळे या विभागांनी मंजूर केलेल्या कामांवर आता मजूर मिळत नाहीत. तसेच नवीन कुशल कामे करण्यास व्हेंडर तयार नसल्याने ही कामे थांबली असल्याचे चित्र आहे.
कुशलचे १२ कोटी थकले
रोजगार हमी योजनेतून अनेक कुशल कामे जसे शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे केली जातात. या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उवरित अकुशल कामांचा समावेश असतो. त्यातील कुशल कामाची रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. जिल्ह्यातील कुशलच्या कामांची १२.३७ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकीत आहेत. यामुळे रोजगार हमी योजनेतून केली जाणारी सर्वच कुशल, अकुशल कामे अडचणीत आली आहेत.