Dr. Pulkundwar Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

डॉ. पुलकुंडवार का संतापले? 30एप्रिलनंतर रस्त्यात खड्डे खोदल्यास...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी गॅस पाइपलाइनसाठी केलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात मागील वर्षीप्रमाणे पावसाळ्यात खड्ड्यांची डोकेदुखी नको म्हणून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ३० एप्रिलनंतर शहरात कुठेही रस्ते खोदकाम करण्यात येणार नाहीत. तसेच १५ मेपर्यंत सर्व खड्डे बुजवून रस्ते सुरळीत करण्यात यावेत,अशा सूचना महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यानंतर शहरात नवीन खोदकाम झाल्यास संबंधित उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

नाशिक शहरात दोन वर्षांपूर्वी सुरुवातीला मोबाइल कंपन्यांचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले. ते काम संपते ना संपते तोच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदकाम सुरू झाले. मागील वर्षी पावसाळ्यातही हे काम सुरू होते. एमएनजीएलने रस्ते खोदकामासाठी शुल्क भरून परवानगी घेतली आहे. मात्र, हे खोदकाम काम दोन वर्षांपासून सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

नियमानुसार एकावेळी २०० ते ३०० मीटरपर्यंत खड्डे खोदून तेथे पाईपलाईन टाकावी व रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदार खर्च वाचवण्यासाठी एका वेळी एक ते दीड किलोमीटर खड्डा खोदून ठेवतो. यामुळे ते काम पूर्ण करण्यास अधिक वेळ लागत असल्याने नागरिकांची गैरसोय अधिक दिवस होते. त्यात बऱ्याचदा सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन अथवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन या कामामुळे फुटतात. त्यामुळे काम करण्यास अधिक वेळ जातो व नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडते.

महापालिकेकडून संबंधित ठेकेदारांना यापूर्वी सूचना देण्यात देऊनही फार फरक पडला नाही. त्यात आता पावसाळा तोंडावर आल्याने आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी ३० एप्रिलनंतर कोणताही रस्ता फोडला जाणार नाही आणि १५ मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते पूर्ववत झाले पाहिजे, असे आदेशच बांधकाम विभागाला दिले आहेत. 

रस्ते खोदकाम केल्यानंतर ते पूर्ववत केले नाही तर पावसाळ्यात अपघाताची शक्यता असते, ही बाब आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या नजरेस आणून दिली आहे. यामुळे हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. रस्त्यावर खड्डे आढळून आल्यास विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यास तात्काळ लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास संबंधित अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारही डॉ. पुलकुंडवार यांनी दिला आहे.