Dr. Bharati Pawar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : डॉ. भारती पवारांनी कानउघडणी केल्यानंतर पालिकेला जाग; शहरात 40 ठिकाणी...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पंधराव्या वित्त आयोगाच्या १९ कोटींच्या निधीतून नाशिक महापालिका (NMC) कार्यक्षेत्रात ४० आरोग्य वर्धिनी केंद्र पूर्णत्वाकडे आले असून, उर्वरित ६६ केंद्रांचेही काम पूर्ण केले जाईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका या निधीचा विनियोग करीत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या केंद्रांसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण महापालिकेकडून दिले जात होते. अखेर वाद नसलेल्या जागा ताब्यात घेत महापालिकेने ४० ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्याचे काम सुरू असून, इतर जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

नाशिक महापालिका हद्दीत केंद्र सरकारच्या १५वा वित्त आयोगाच्या निधीतून १०६ आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मात्र, या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उभारणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काहीही प्रगती होत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे बिटको, जाकीर हुसैन, पंचवटी, सिडको या पालिकेच्या रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. आरोग्य वर्धिणी केद्रात एक तज्ज्ञ डॉक्टर, सीस्टर, स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय सेवक असणार आहे. नागरिकांना अधिक जलद व वेळेवर आरोग्यसेवा मिळणार आहेत.

नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असून लोकसंख्या वाढत आहे. एकीकडे लोकसंख्या वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य सुविधेवर ताण पडत आहे. शहरातील लोकसंख्येच्या तूलनेत महापालिकेच्या उपकेंद्रांची संख्या कमी आहे. गरीब घटकातील रुग्णांसाठी महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केद्र यांचा आधार आहे. मात्र, महापालिका रुग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी होत असते. रुग्णांना अनेकदा पालिका रुग्णालयात गेल्यावर गर्दीमुळे तत्काळ उपचार होत नाही. अधिकच्या गर्दीमुळे डॉक्टरांवर अधिक ताण येत असल्याचे चित्र आहे.

या आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे हा ताण कमी कमी होण्यास मदत मिळणार आहे. मात्र, महापालिकेच्या जागांवर आमदार, खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या समाज केंद्र व सभागृह राजकीय कार्यकर्त्यांच्या संस्थाना देण्यात आले असून, त्या संस्था याठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यास जागा देण्यास तयार नाहीत. यामुळे ही आरोग्य वर्धिनी केंद्रे रखडली आहेत. दरम्यान महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याने अखेरीस पहिल्या टप्प्यात ४० ठिकाणी लवकरच ही केंद्रे सुरू होणार आहेत.

विभागनिहाय आरोग्यवर्धिनी

सिडको : २१

पंचवटी : २०

पश्चिम : १४

नाशिक पूर्व : १७

नाशिकरोड : १६

सातपूर : १८

आरोग्य वर्धिनी केंद्रांची कामे लवकर व्हावीत याकरिता प्रयत्न सुरू आहेत. चाळीस केद्र प्रगतीपथावर असून, उर्वरीत केंद्रे लवकर साकारली जाणार आहेत.

- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त तथा प्रशासक