Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 'या' कारणांमुळे पुन्हा लांबला 'नमामि गोदा'चा DPR

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा 'नमामि गोदा' (Namami Goda) प्रकल्प प्रशासकीय कामकाजात अडकला असतानाच आता नियमानुसार इको सेन्सेटिव्ह झोनचा समावेश या प्रकल्पात करावा लागणार आहे. यासाठी प्रकल्प सल्लागार संस्थेने सांगितल्यानुसार महापालिकेनेही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार केला आहे. परिणामी नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीची स्वच्छता तसेच सुशोभिकरण यासाठी 'नमामि 'गोदा' प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून प्रकल्पासाठी जवळपास १८०० कोटी रुपये देण्यात तत्वता मंजुरी दिली आहे.

प्रकल्पात प्रामुख्याने नदी नाल्यांमध्ये वाहणारे सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळवणे, अहमदाबादच्या साबरमती नदी प्रकल्पाच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करणे, नदीची जैवविविधता जपणे, घाटांचे नूतनीकरण करणे, स्मशानभूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीचा प्रवाह वाहता व स्वच्छ ठेवणे, नदीकिनारी असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, नदीतील जलचरांची निगा राखणे व जतन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, जलचरांच्या विविध प्रजाती पूर्ववत करणे व त्यांचे संवर्धन करणे.

त्याचबरोबर घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा प्रकल्पात समावेश आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्त केली आहे.

संस्थेमार्फत नागरिकांना पुरवण्यात येणारे सुविधांचे जीआयएस मॅपिंग करून बेसमॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी नगर नियोजन विभागाकडून ड्रोन सर्वे केला जाणार आहे. ड्रोन सर्वे होत नसल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्यासाठी विलंब होत आहे. असे असताना आता इको सेन्सेटिव्ह झोनचा मुद्दा समोर येत आहे.

नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना केवळ नदी स्वच्छता व सुशोभिकरण यावर भर दिल्याचे आतापर्यंत लक्षात आले. या प्रकल्पात नियमाप्रमाणे नदी काठावरील जैवविविधतेचाही विचार करणे आवश्यक असल्याने संबंधित सल्लागार संस्थेने महापालिकेकडून त्याबाबत माहिती मागवली आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्र व्यवहार करीत इको सेन्सेटिव्ह झोनची माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या माहितीच्या प्रकल्पाचा बेस मॅप तयार केला जाणार आहे

प्रकल्पातील प्रमुख कामे
नवीन मलजल व सांडपाणी वाहिन्या टाकणे  
मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती व क्षमतावाढ करणे
मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र उभारणे
नदी किनारा सुशोभिकरण करणे
गोदावरीवरील घाटांचे नूतनीकरण करणे