Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी डीपीसीमधून 30 लाख निधी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याच्या टँकर्ससह मोबाइल टॉयलेट्स उपलब्ध होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी १० सीटचे १२ मोबाइल टॉयलेट्स पंढरपूरपर्यंत पुरवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथून २ जून रोजी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून वारकरी आषाढ शुद्ध दशमी रोजी पंढरपूरात पोहोचणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो. त्यासाठी जिल्हा2परिषद सेस निधीतून चार लाख रुपयांची तरतूद केली जाते.

मात्र, एवढया मोठया दिंडी सोहळ्यात ही सुविधा अपुरी पडत आहे. यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निर्मलवारीसाठी फिरते टॉयलेट व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा पुरवण्याचीमागणी केली होती.  त्या मागणीला प्रतिसाद देत पालखी सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर्स पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय १२ फिरते टॉयलेट्सदेखील पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच ३० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला आहे.