Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थ कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आली जाग; सरकारशी पत्रव्यवहार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी नाशिक महापालिकेने सिंहस्थ प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर आता जिल्हा प्रशासनालाही सिंहस्थ जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यासाठी जाग आली आहे. जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ विशेष कक्ष स्थापन करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा साडेतीन वर्षांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थ कुंभमेळाचाजागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला असल्याने यावेळचा सिंहस्थ आगळावेगळा ठरणार आहे. सिंहस्थाच्या वर्षभराच्या कालावधीत देशभरातून भाविक नाशिकमध्ये येतात. सिंहस्थातील शाही स्नानासाठी त्र्यंबकेश्वर येथे दहा व नाशिक येथे तीन आखाड्याचे साधू येतात. या साधूंच्या व त्यांच्यासोबत येणाऱ्या भाविकांसाठी साधुग्राम उभारले जाते. या काळातील सुरक्षा यंत्रणा, पोलिस बंदोबस्त, गर्दीचे व्यवस्थापन आदी बाबींसाठी बऱ्याच आधीपासून काम सुरू करावे लागते. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने प्रारूप आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्यास मान्यता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जिल्हास्तरीय समितीच अस्तित्वात नाही. यामुळे सिंहस्थाच्या तयारीवर देखरेखीसाठीविशेष कक्ष स्थापन करण्यास परवानगीद्यावी, असे पत्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाला लिहिले आहे. प्रशासन आता शासनाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.या विशेष कक्षाचे प्रमुखपद अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे राहणार आहे. याकक्षाला दोन उपजिल्हाधिकारी असतील. नियोजन, कामांची अंमलबजावणी व निधी खर्च करण्याशी संबंधित बाबींची प्रक्रिया हे अधिकारी राबवतील. दरम्यान, सिंहस्थातील भूसंपादन प्रक्रियेसह विविध कामांसाठी कर्मचाऱ्यांचीही आवश्यकता भासणार आहे.

त्र्यंबकेश्वरकडे दुर्लक्ष

दरम्यान जिल्हा प्रशासन स्तरावर अद्याप सिंहस्थ कक्ष स्थापन झालेला नसल्याने त्र्यंबकेशर येथील सिंहस्थच्या पूर्वतयारीबाबत कोणतीही हालचाल सुरू नाही. दुसरीकडे महापालिकेने प्रारूप आराखडा तयार केला आहे. पालकमंत्री केवळ महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांबाबतच विचार करीत असल्याचे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर येथे १३ पैकी १० आखाडे शाहीस्नान करीत असताना तेथील सिंहस्थाच्या तयारीकडे होणारे दुर्लक्ष अचंबित करणारे आहे.