नाशिक (Nashik) : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील टोकडे येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीने केलेला रस्ता शोधण्यासाठी विभागीय आयुक्तांनी धुळे येथील कार्यकारी अभियंत्यांचे पथक पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा १८ लाख रुपयांचा रस्ता दाखवा व पाच लाख रुपयांचे बक्षिस मिळवा, असे जाहीर केल्याने मार्चमध्ये हा रस्ता चर्चेत आला होता.
दरम्यान जिल्हा परिषदेने त्यांच्या पातळीवर कार्यकारी अभियंत्यांकडून या रस्त्याची शहनिशा करून रस्त्याचे काम झाल्याचा अहवाल सादर केला होता.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दोनने टोकडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शिवरस्ता करण्यासाठी १८ लाख रुपयांच्या कामाला कार्यारंभ आदेश दिले होते. संबंधित ग्रामपंचायतीने व ठेकेदाराने या रस्त्याचे काम चुकीच्या जागेवर दाखवले आहे व काम न करताच देयक काढून घेतले आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी केली होती. हा रस्ता शोधून देण्याऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षिसही त्यांनी जाहीर केले होते.
या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी बांधकाम विभाग क्रमांक दोनचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यात सांगितले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार या निधीतून शिवरस्त्याचे काम केले असल्याचे नमूद करण्यात आले.
या अहवालामुळे समाधानी न झालेल्या विठोबा द्यानद्यान यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत तक्रार करून रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. यामुळे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील संबंधित रस्त्याची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे पथक १४ सप्टेंबरला टोकडे येथे येऊन या रस्त्याच्या कामाची तपासणी करणार आहे. यामुळे टोकडे येथील रस्ता पुन्हा सहा महिन्यांनी चर्चेत आला आहे.