नाशिक (Nashik) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्याच्या सहसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये पत्र पाठवून नाशिक येथील संदर्भ रुग्णालयासाठी ३५ लाख रुपये निधीतून रक्त संकलन व्हॅन खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, मागील सहा महिन्यांपासून आरोग्य विभागाने केवळ तांत्रिक मान्यता मिळवली असून, आरोग्यासारख्या जीवनावश्यक सेवेच्या क्षेत्रासाठीही निवडणूक आचारसंहितेचे कारण देऊन टेंडर प्रक्रिया राबवली जात नाही.
आता आचारसंहिता उठल्यानंतर जूनमध्ये जीईएम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान संदर्भ रुग्णालयास नवीन शस्त्रक्रिया विभाग सुरू करायचे असून त्यासाठी मोठ्याप्रमाणावर रक्तसंकलनाची आवश्यकता आहे. मात्र, या रक्तसंकलन व्हॅनअभावी संदर्भ रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्ष सुरू करण्यात अडचणी येत आहेत.
नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे अतिविशिष्ट सेवा रुग्णालय असून या ठिकाणी हृदयशस्त्रक्रिया (ओपन हार्ट सर्जरी), मुत्रपिंडशस्रक्रिया (युरोलॉजी) व किडणी ट्रान्सप्लान्ट सुविधा मंजूर असून, त्या लवकरच सुरू करायच्या आहेत. सध्या या संदर्भ रुग्णालयात नेफ्रॉलॉजी (दैनंदिन डायलेसिस सुविधेसह) व कर्करोग शस्त्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून तसेच लगतच्या मराठवाडा, विदर्भ व कोकण विभागातूनही रुग्ण येत असतात.
या संदर्भ रुग्णालयाच्या टप्पा-२ इमारत पूर्ण झाली असून. तेथे मेंदूशस्त्रक्रिया (हेड इंज्युरी व अपघातासह), सुगठण शस्त्रक्रिया (प्लास्टीक सर्जरी) व बालरोग शस्त्रक्रिया (पेडीअॅट्रीक सर्जरी) हे विभाग कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे संदर्भ रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्तसाठ्याची गरज दुपटीपेक्षाही जास्त वाढणार आहे.
यासाठी अद्ययावत रक्तसंकलन व्हॅनची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्याच्या सहसंचालकांकडे रक्त संकलन व्हॅनसाठी मागणी नोंदवली होती. त्यांच्या पत्राची दखल घेऊन त्यासाठी ऑक्टोबरमध्ये पत्र पाठवून रक्त संकलन व्हॅन उपलब्ध करून देण्यासाठी मागणी पत्र पाठवले.
त्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राज्याच्या सहसंचालकांनीही तातडीने ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून २०२३-२४ या वर्षासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी तरतूद असलेल्या १.४० कोटी रुपयांच्या निधीतून ३५ लाख रुपये रकमेचे रक्त संकलन वाहन खरेदी करण्याचे निर्देश दिले होते.
या पत्रानंतर सहा महिन्यांमध्ये केवळ या व्हॅनसाठी तांत्रिक मान्यता देण्यातच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वेळ घालवला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून निधी खर्च करणे, निधीचा ताळमेळ करणे याबाबत सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे. या विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून २०२२-२३ या वर्षातील प्राप्त झालेल्या निधीचा २०२३-२४ हे वर्ष संपले, तरी ताळमेळ लावता आलेला नाही.
यामुळे निधी खर्चाबाबत अनास्था असलेल्या या विभागाने त्यांच्या खाक्याप्रमाणे सहा महिन्यांमध्ये केवळ रक्त संकलन वाहनाला तांत्रिक मान्यता मिळवली आहे. यामुळे विभागीय संदर्भ रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड शस्त्रक्रिया, किडनी ट्रान्सप्लान्ट, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व पेडीअॅट्रीक सर्जरी हे विभाग कार्यान्वित करण्याचे काम रखडले आहे.
रक्त संकलन व्हॅनशिवाय हे काम सुरू करता येणार नसले, तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत काहीही गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक सेवा आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे रक्त संकलन व्हॅन खरेदीसाठी लोकसभा निवडणुकीचा अडथळा येण्याचे कारण नाही. मात्र, आचारसंहिता उठल्यानंतर या रक्त संकलन व्हॅनची खरेदी प्रक्रिया राबवली जाईल, असे संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आले.