Nashik Currency Note Press Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : आता नेपाळच्याही नोटांची छपाई होणार नाशिकच्या प्रेसमध्ये

चीन, फ्रान्सला मागे टाकत नाशिक प्रेसला नोटा छपाईचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसला नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष, तर पन्नासच्या ३०० अशा ७३० दशलक्ष नोटा छपाईचे कंत्राट मिळवण्यात यश आले आहे. याबाबत नुकताच नेपाळबरोबर करार करण्यात आला आहे. नेपाळरोबरच भारतीय ५,३०० दशलक्ष नोटा छापण्याचे मोठे कामही प्रेसकडे आहे, यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

या सर्व नोटा एका वर्षात छापून द्यायच्या आहेत. यामुळे नाशिकरोडच्या भारतीय चलार्थ मुद्रणालयात वर्षभरात सहा हजार कोटींपेक्षा अधिक नोटांची छपाई होणार आहे. विशेष म्हणजे चीनलाही स्पर्धेत मागे टाकून नेपाळच्या एक हजाराच्या नोटा छापण्याचे, तर फ्रान्सला मागे टाकून नेपाळच्या पन्नासच्या नोटा छपाईचे काम भारतीय नोटप्रेसला मिळाला आहे.

देशात ऑनलाइन व्यवहार, यूपीआय, डेबिट कार्डचा वापर वाढत आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजीटल करन्सी प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. यामुळे दिवसेंदिवस कागदी चलनाचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या देशातील नोट प्रेसमध्ये इतर देशांच्या नोटा छपाई करण्यासाठी कामे मिळवण्यास सुरुवात केली आहे.

जगभरात आजही ५० ते ६० देश त्यांचे चलन बाहेरून छापून घेतात. यामुळे एक्सपोर्ट पॉलिसीच्या माध्यमातून चलार्थपत्र मुद्रणालयात स्वतंत्र एक्सपोर्ट विभाग बनवण्यात आला आहे. नाशिकरोड चलार्थपत्र मुद्रणालयात यापूर्वी २००५ मध्ये नेपाळच्या नोटा छापल्या होत्या. यंदा पुन्हा नेपाळ सरकारने एक हजार रुपयांच्या ४३० दशलक्ष, पन्नासच्या ३०० दशलक्ष अशा ७३० दशलक्ष नोटा छापण्याचे काम दिले आहे. हे काम वेगात पूर्ण होण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहेत.

नोटबंदी काळात तब्बल एक वर्ष एकही सुटी न घेता नाशिकच्या नोटप्रेसने अब्जावधी नोटा छापल्या होत्या. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रेस कामगार नेत्यांचा दिल्लीत सत्कारही केला होता. करोनाचे संकट संपत नाही तोच आता भारत सरकारने डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपयाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली आहे. या डिजिटल करन्सीमुळे छापील नोटांच्या छपाईवर परिणाम होऊन नोटप्रेसमधील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते, अशी भीती कामगार संघटनांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे डिजीटल करन्सीला विरोध करण्यासाठी नुकतेच सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच नाशिकरोड येथे सभा होऊन डिजीटल करन्सीला विरोध करण्यात आला होता.

दरम्यान मागील काही महिन्यांपासून नेपाळच्या नोटांच्या छपाईबाबतची तांत्रिक प्रकिया सुरू होती. नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट नाशिकरोडच्या नोटप्रेसला नोव्हेंबर २०२२ मध्येच जाहीर झाले होते. त्यानंतरची सर्व तांत्रिक बाबींची पूतर्त झाली असून आता प्रत्यक्ष नोटा छपाईस सुरवात होणार आहे. यामुळे नाशिकरोडच्या चलार्थ पत्र मुद्रणालयात या वर्षभरात नेपाळच्या ७३० दशलख व भारतीय ५३०० दशलक्ष नोटांची छपाई होणार आहे.