Nashik Road Railway Station Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभारणार क्राउड मॅनेजमेंट सिस्टिम

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येथे २०२६-२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका तयारी करीत असतानाच रेल्वे मंत्रालयानेही गर्दी नियोजनासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. 

यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनलगत जवळपास दीड लाख भाविकांचे क्रॉउड मॅनेजमेंट करण्यासाठी सिन्नर फाटा स्टेशनवाडी अर्थातच नाशिकरोडच्या पूर्व भागाकडे दुसरे प्रवेशद्वार विकसित केले जाणार आहे. सिंहस्थ पर्वणीसाठी आलेले भाविक या ठिकाणी थबकतील या पद्धतीने तेथे सुविधा उभारल्या जाणार आहेत.  त्यात प्रामुख्याने मॉलच्या रचनेप्रमाणे प्रवेशद्वार विकसित केले जाईल.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. नाशिक महापालिकेने  ११ हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. सिंहस्थासाठी प्रस्तावित केलेली कामे पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार हे गृहित धरून नियोजन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य सरकारकडे सिंहस्थ कक्ष स्थापन करण्यास पत्रव्यवहार केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधूसंत भाविक येत असतात. खासकरून यातील बहुतांश भाविक रेल्वे प्रवासाला पसंती देतात. पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेही सोडल्या जातात. त्यामुळे शाही पर्वणीला येणाऱ्या एकूण भाविकांपैकी साधारण २५ ते ३० टक्के गर्दी ही रेल्वेवर अवलंबून असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वेतून उतरल्यानंतर हे भाविक थेट गंगाघाटावर न जाता ते काही काळ रेल्वे स्थानकावर थांबतील, असे नियोजन रेल्वे करणार आहे. या व्यवस्थेला त्यांनी क्राउड मॅनेजमेंट सिस्टीम असे नाव दिले आहे.

भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे पूर्वेकडील प्रवेशद्वार विकसित केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाचे रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी प्रस्ताव तयार करीत आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने नाशिक महापालिकाही या भागात पुरक रस्ते, पाणीपुरवठा, मलनिसारण, वाहनतळ, सिटी लिंकच्या बसेसचा डेपो आदी बाबी उपलब्ध करून देणार आहे.

नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ वातानूकलित दुकाने, रेस्ट रूम, सरकते जिने, लिफ्ट, आधुनिक तिकिटघरापासून तर खान-पानाच्या हॉटेल्सचीही रेलचेल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सुविधा देण्याची पालक संस्था म्हणून नाशिक महापालिकेवर जबाबदारी असणार आहे.

या ठिकाणची मोकळी जागा विकसित करणे, संलग्न रस्त्यांची डागडुजी करणे,  भाविकांना गोदावरी किनारा ते पुन्हा रेल्वे स्टेशनला परतता येईल या पद्धतीने वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.