Nashik Airport Ozar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: खूशखबर! 'या' कंपनीची गोवा, नागपूर, अहमदाबाद विमानसेवा सुरू

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : इंडिगो (Indigo) कंपनीने नाशिकमधील विमानसेवेला बुधवार (ता. १५) पासून प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी नागपूर, गोवा व अहमदाबाद (Nagpur, Goa & Ahmedabad) या तीन ठिकाणांसाठी सेवा देणार आहे.

ओझर विमानतळ येथून मागील वर्षापर्यंत तीन विमान कंपन्यांकडून सेवा दिली जात होती. त्यात स्पाईसजेट (Spice Jet) वगळता इतर कंपन्यांनी नोव्हेंबरपासून सेवा अचानक बंद केली. त्यामुळे 'स्पाइसजेट' कडून नवी दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठीच सध्या सेवा सुरू आहे.

नाशिकमधून इतर शहरांना जोडणारी विमानसेवा खंडित झाल्यामुळे अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. राजकीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी केंद्रीय उड्डयनमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यांच्याकडून आलेल्या उत्तराचा आधार घेऊन राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, खंडित झालेल्या सेवा काही सुरू झालेल्या नाहीत.

दरम्यान, नाशिकमध्ये आणखी कंपन्यांनी सेवा सुरू करावी, यासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राकडून पाठपुरावा सुरू होता. या पार्श्वभूमीवर इंडिगो कंपनीने नाशिकमध्ये सेवा देण्याचे निश्चित केले आहे. कंपनीच्या पथकाने मागील महिन्यात ओझर विमानतळाला भेट देऊन पाहणी केली व सेवा देणे निश्चित केले आहे.

कंपनीने ओझर विमानतळावर प्रवाशांना सेवा देण्यासाठी जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. पहिल्या टप्प्यात गोवा, नागपूर व अहमदाबाद या तीन ठिकाणी जाता येणार असून, हैदराबाद सेवेसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान गोवा, अहमदाबाद व नागपूर येथून हैदराबादला जाण्यासाठी कनेक्टिंग विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

असे आहेत तिकीट दर
'इंडिगो'चे साधारण पंधरा दिवस आधी तिकीट बुकिंग केल्यास एक व्यक्तीसाठी भाडेदर पुढील प्रमाणे असणार आहेत : अहमदाबाद- २,७७६ रुपये, नागपूर- ३,२९९ रुपये, गोवा- ३,४०६ रुपये.

विमानसेवेचे वेळापत्रक
ठिकाण..............प्रस्थान..............................पोहोचणार
गोवा ते नाशिक :  दुपारी १-४०                             दुपारी ३-२५
नाशिक ते गोवा :  सकाळी ११-२०                         दुपारी १-१०
अहमदाबाद ते नाशिक : सायं. ५-५०                      सायं. ७-१५
नाशिक ते अहमदाबाद : दुपारी ३-४५                      सायं. ५-२५
नागपूर ते नाशिक : सकाळी ९-१५                  सकाळी ११-००
नाशिक ते नागपूर : सायं. ७-३५                        रात्री ९-२५