Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : खड्डे बुजवण्यासाठी डांबरी रस्त्यावर काँक्रिटचा थर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : दर पावसाळ्यात निर्माण होत असलेल्या खड्ड्यांच्या (Potholes) समस्येतून मुक्ततेसाठी नाशिक महापालिकेने व्हाइट टॉपिंग (White Tapping) म्हणजे डांबरी रस्त्यावरील खड्डे काँक्रिटीकरणातून बुजवण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. व्हाइट टॉपिंगने काम केल्यानंतर किमान तीन वर्षे खड्डा पडत नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महापालिका या वर्षापासून शहरातील डांबरी रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटचे पॅच टाकण्याचे काम सुरू होणार असून, पहिल्या वर्षी १२० किलोमीटर लांबीचे रस्ते व्हाइट टॉपिंग केले जाणार आहेत.

नाशिक महापालिकेने गेल्या ५ वर्षांत नवीन रस्ते व रस्त्यांची दुरुस्ती यासाठी जवळपास १२०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतरही प्रत्येक पावसाळ्यात नाशिककरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो.

नवीन रस्ता तयार केल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी काही वर्षे  ठेकेदाराकडे असते. सामान्यपणे या कालावधीत रस्ते उखडणार नाहीत, असे मानले जाते. मात्र, मागील दोन ते तीन वर्षात नवीन रस्तेच उखडत असल्यामुळे बांधकाम विभाग वादाच्या भोवऱ्यात आहे. यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात असतात.

त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील डांबरी रस्त्यांवर व्हाईट टॉपिंग म्हणजे काँक्रिटचा थर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान ३ वर्षे संबंधित रस्त्यावर खड्डा पडण्याची व उखडण्याची चिंता मिटणार असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

भविष्यात या रस्त्याचे काँक्रिटीकरण करायचे असले तरी हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार असल्याचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांचे म्हणणे आहे.

डॉ. अशोक करंजकर यांनी महापालिकेकडून भविष्यात काँक्रिटचे रस्ते करण्यास प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. आता काँक्रिटीकरण करण्यापूर्वी प्रमुख मार्गांवरील डांबरी रस्त्यांवर किमान पुढील तीन वर्षे खड्डे पडणार नाहीत, यासाठी व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.