नाशिक (Nashik) : महापालिकेच्या सिटी लिंक (City Link) या परिवहन सेवेच्या वाहकांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशांची, तसेच महापालिकेचीही मागच्या आठवड्यात अडचण झाली. यातून तोडगा काढण्यासाठी सिटीलिंक कंपनीने आता वाहक पुरवण्यासाठी आणखी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यस्थितीत दोन्ही डेपोंतील ५५० वाहक एकाच ठेकेदाराचे असल्याने त्यांनी आंदोलन पुकारल्यास बससेवा ठप्प होऊन प्रशासनाची कोंडी होते. यातून तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेतला असून सध्या इच्छुक ठेकेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
नाशिक महापालिकेने 2021 मध्ये सिटीलिंक अंतर्गत शहर बससेवा सुरू केली. या सेवेसाठी वाहकांचे दोन ठेकेदार नेमण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात एकाच ठेकादारामार्फत वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदाराला 400 वाहकांची मर्यादा आहे. मात्र, शहर बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला, यामुळे सिटीलिंकला आणखी वाहकांची गरज पडली. ती गरज भागवण्यासाठी सिटीलिंकने त्याच ठेकेदाराकडून आणखी वाहक मिळवण्यासाठी मर्यादा वाढवून दिली व दुसऱ्या ठेकेदार नियुक्तीचा विषय मागे पडला. दरम्यान विविध मागण्यांसाठी या वर्ष दीड वर्षांत वाहकांनी दोन ते तीन वेळा कामबंद आंदोलने केली. आंदोलनांमुळे सिटीलिंक कंपनी व महापालिका यांच्या प्रतिमेस धक्का बसला. यातून तोडगा काढण्यासाठी सिटीलिंकने दुसरा ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. यासाठी टेंडर मागवण्यात आल्याने मुंबई आणि नागपूर येथील दोन जणांनी तयारी दर्शवली आहे. त्यांची कागदपत्रे तपासणी सुरू आहे. नागपूरच्या कंपनीने ती सादर केली असून, मुंबईच्या कंपनीकडून अद्याप कागदपत्रे जमा करण्यात आलेली नाही.
सिटीलिंक सध्या पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. या दोन्ही डेपोतील वाहक एकाच कंपनीचे असल्याने आंदोलन झाल्यास संपूर्ण सेवा ठप्प होते. दुसऱ्या ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर दोन्ही डेपोंना स्वतंत्र ठेकेदारामार्फत वाहकांची नियुक्ती करता येऊ शकणार आहे.
दरम्यान, सिटीलिंकला वाहक पुरवण्याची दोन संस्थांनी तयारी दर्शविली आहे. त्यापैकी एका संस्थेने सर्व कागदपत्रे सादर केली असली तरी दुसऱ्या संस्थेने अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाही. त्यामुळे ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.