CityLink Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिटीलिंक बसेवा 2 वर्षांत सहाव्यांदा ठप्प; कर्मचारी का गेले संपावर?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिटी लिंक (City Link Bus) कर्मचाऱ्यांचे  वेतन थकीत असणे, दिवाळीला बोनस न देणे, भविष्य निर्वाह निधी जमा न करणे आदी कारणांमुळे ४५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे नाशिक शहरातील चाकरमानी व नागरिकांचे हाल होऊन त्यांना खासगी वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागला.

सिटीलिंक बस सेवा सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न देण्याच्या कारणामुळे वादग्रस्त झाली असल्याने आतापर्यंत दोन वर्षांत कर्मचाऱ्यांना सहा वेळा कामबंद आंदोलन करावे लागले आहे.

नाशिक महापालिकेने जुलै २०२१ मध्ये महानगर परिवहन महामंडळाच्या अंतर्गत सिटीलिंक शहर बससेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी वाहक पुरवण्यासाठी  एकाच ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. 

सिटीलिंकला सिटीलिंक बससेवा  पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. मात्र, या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्याचप्रमाणे इतरही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना सातत्याने आंदोलन करावे लागत आहे. यामुळे सिटीलिंक बससेवेची प्रतिमा मालिन झाली आहे. यावेळीही कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांच्या बोनसची मागणी केली होती.

ती मागणी ठेकेदार कंपनीने पूर्ण केली नाहीच, उलट मागील महिन्याचे वेतनही दिले नाही. यापूर्वीही तीन महिन्यांचे वेतन थकवले होते. यामुळे सिटीलिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून पहाटेपासून एकही बस रस्त्यावरधावली नाही.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

- ईएसआय व भविष्य निर्वाह निधी वर्गणी सात महिन्यांपासून भरलेली नाही तो लगेच भरावा

- ईएसआयचे पैसे भरले नसल्याने उपचार मिळत नाही

- विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून३६४ रुपये दंड घेतला जातो. मात्र वाहकाकडून तीन ते पाच हजार वसूल केला जातो. एवढया मोठ्या रकमेच्या दंडाची वसुली बंद करावी.