नाशिक (Nashik) : सरकार आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री (CM Eknath Shinde), व दोन उपमुख्यमंत्री (DCM) यांनी नाशिक शहर व जिल्ह्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या व रखडलेल्या अनेक प्रकल्पांबाबत घोषणा करीत ते मार्गी लावण्याची आश्वासने दिली. यात प्रामुख्याने रखडलेला नाशिक - पुणे हाय स्पीड रेल्वे मार्ग, नाशिक शहारातील निओ मेट्रो प्रकल्प, नदीजोड प्रकल्प, कुंभमेळा कोरिडॉर, सर्क्युलर कॉरिडॉर आदी प्रकल्प मार्गी लावण्याची आश्वासने नव्याने देण्यात आली.
नाशिक येथे 'सरकार आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी कार्यक्रमात भाषणांमध्ये तसेच पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी नाशिकच्या रखडलेल्या प्रकल्पांचा उल्लेख करून ते मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निओ मेट्रो प्रकल्पाबाबत दिल्ली येथे तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण सुरू असून त्यानंतर नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्प मार्गी लागेल, असे आश्वासन दिले. याशिवाय कुंभमेळा कॉरिडॉर उभारण्याची नवी घोषणा त्यांनी केली.
तसेच नाशिकला सर्क्युलर कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच नाशिक - पुणे रेल्वे मार्ग मार्गी लावणार असल्याचा ओझरता उल्लेख त्यांनी केला. नदीजोड प्रकल्प मार्गी लावून नाशिक, नगर, मराठवाडा या भागाचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत नाशिक - पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, हा प्रकल्प महारेल कंपनीच्या माध्यमातून उभारण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाला हा प्रकल्प उभारायचा असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रकल्प कोणी उभारायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कुंभमेळ्यापूर्वी नाशिकचा रिंगरोड उभारला जाईल, असे त्यांनी सांगितले. सरकार आपल्या दारी कार्यक्रमातील भाषणात अजित पवार यांनी नाशिकसह राज्यातील नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मागील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, राज्य सरकार एक लाख कोटी रुपये यासाठी खर्च करून हे प्रकल्प मार्गी लावेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याशिवाय गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याचीही त्यांनी घोषणा केली. एकंदरीत नाशिक येथे कार्यक्रमासाठी आल्यामुळे नाशिकच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला असला तरी त्याबाबत केवळ उल्लेख करण्यापलीकडे त्यात ठोस काहीही नव्हते, असे दिसून आले.