नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील वाहतूक बेटे व दुभाजक सुशोभिकरण व देखभालीचे कामासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने राबवलेल्या टेंडर (Tender) प्रक्रियेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात 'एन कॅप'मधील अडीच कोटी रुपये निधी वापरला जाणार आहे. यामुळे सिडको व नाशिक पूर्वमधील वाहतूक बेटे व दुभाजकांना झळाळी दिली जाणार आहे.
शहर सुशोभीकरणाचा भाग म्हणून नाशिक महापालिका रस्ते दुभाजकांमधील हिरवाई, वाहतूक बेटांमधील कारंजे, शिल्पकृती शहराच्या वैभवात भर घालत असते. मात्र, पुरेशा निधी अभावी वाहतूक बेटे विकसित करणे व त्यांची देखभाल खासगी विकासकांकडे देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित दुभाजके व वाहतूक बेटांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांनी देखभालीअभावी माना टाकल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. रस्ते दुभाजकांमधील वृक्षवेलींची तसेच वाहतूक बेटांची देखभालीअभावी रया गेली असून त्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे उद्यान विभागाने नवीन नाशिक व नाशिक पूर्व विभागातील वाहतूक बेटे व दुभाजकांचे तीन वर्षांसाठी देखभाल व सुशोभीकरण काम ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून स्वच्छ शहर कार्यक्रमांतर्गत म्हणजे एन-कॅप योजनतून प्राप्त झालेलानिधी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेला एन-कॅप योजनेतून चार वर्षांत जवळपास ८५ कोटी रुपये निधी प्राप्त होऊनही फारच थोडा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. निधी वेळेत खर्च होत नसल्यामुळे तो परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने त्यातील काही निधीमधून रस्ते दुभाजकांचा विकास करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नाशिक पूर्व व सिडको या दोन भागातील रस्ते दुभाजक व वाहतूक बेटांचे सुशोभिकरण व देखभाल करण्याचा निर्णय झाला.
या कामांसाठी नाशिक पूर्वमध्ये ८९ लाख तर नवीन नाशिकमध्ये एक कोटी ७१ लाख रुपये खर्चाची टेंडर प्रक्रिया राबवली. या टेंडरला महासभेने मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला होता. स्थायी समितीने त्या टेंडरला मंजुरी दिली आहे. यामुळे या भागांमधील वाहतूक बेटे व रस्ते दुभाजकांमधील हिरवळीच्या देखभालीचे काम ठेकेदाराला ३६ महिन्यांसाठी दिले जाणार आहे.