Sakri - Shirdi Highway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: साक्री-शिर्डी मार्गाच्या उप कंत्राटदाराविरोधात बॅनरबाजी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : साक्री-शिर्डी (Sakri - Shirdi) या राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने (Contractor) काम अर्धवट टाकून तो पसार झाला आहे. यामुळे साक्री व बागलाण तालुक्यातील काही गावांमध्ये या ठेकेदाराविरोधात निनावी फलक लावण्यात आले असून, या ठेकेदारापासून सावध राहा, असा सल्ला देण्यात आला आहे. या फलकांमुळे महामार्ग उभारण्याचे ठेके घेऊन त्यासाठी उपकंत्राटदार नेमण्याच्या पद्धतीमुळे कामाच्या दर्जावर होणारा परिणामही समोर आला आहे.

साक्री ते शिर्डी या महामार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे कंत्राट अहमदाबाद येथील एका ठेकेदारास देण्यात आले आहे. या ठेकेदाराने स्वता ते काम न करता त्याने इतर उपकंत्राटदार नेमले आहेत. या उपकंत्राटदाराने काम अर्धवट टाकले व तो पसार झाला आहे. या ठेकेदाराने काम करताना स्थानिक पुरवठादारांची रक्कमही दिली नव्हती. यामुळे महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी व स्थानिक पुरवठादारांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी या महामार्गाच्या कॉंक्रिटीकरणाच्या मूळ ठेकेदाराची परवानगी घेऊन ते काम दुसऱ्या उपठेकेदारास दिले. त्या ठेकेदाराने काम नव्या जोमाने सुरू केले. यामुळे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, या नव्या उपठेकेदाराला मूळ ठेकेदाराकडून कामाचे देयक वेळेत मिळाले नाही. यामुळे या ठेकेदाराने बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे काम थांबवले आहे. मागील दोन महिन्यांपासून काम अर्धवट सोडून दिल्यामुळे हा रस्ता रखडला असून या अर्धवट कामामुळे सर्वत्र धुराळा उडत आहे.

या धुळीमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना श्‍वसनाचे विकार जडून ते आजारी पडत आहेत. तसेच या धुळीमुळे रस्त्याच्या आजुबाजुच्या शेतातील पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. या महामार्गाचा दुसरा उपठेकेदारही निघून गेल्यामुळे रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाच्या मुख्य अभियंत्यांनी आता तिसऱ्या उफठेकेदाराचा शोध घेतला आहे. यामुळे या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान महामार्गाचे कंत्राट मिळवणारे मूळ ठेकेदार स्वता काम न करता उपठेकेदारांच्या माध्यमातून कामे करून घेतात. कामाची रक्कम देण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाल्यास त्याचा रस्त्याच्या दर्जावर परिणाम होतो. तसेच काम लांबल्याने कामाची किंमतही वाढून सरकारचे पर्यायाने करदात्यांचे नुकसान होते. यामुळे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारानेच काम करणे अनिवार्य करण्याचीही मागणी होत आहे.

त्याच दरम्यान साक्री व बागलाण या तालुक्यांमधील ताहाराबाद, पिंपळनेर, दहिवेल आदी गावांमध्ये निनावी बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर रस्त्याचे काम अर्धवट टाकून निघून गेलेल्या ठेकेदराविरोधात मजूर लिहिला आहे. लोकांच्या कष्टाचे पैसे देत नाही, तरी या भामट्यापासून सावध राहा, असे आवाहन या बॅनरद्वारे करण्यात आले आहे. यामुळे हा विषय या परिसरात चर्चेचा झाला आहे.

या बॅनरबाजीमुळे महामार्ग उभारणीच्या कामाचे ठेके देताना व प्रत्यक्ष काम करताना पडद्याआड चालणाऱ्या बाबी समोर आल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.