नाशिक (Nashik) : नाशिक आउटडोर व ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने शहरातील होर्डिंग घोटाळा झाल्याची तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने महिनाभरानंतर अहवाल सादर केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे सादर केलेल्या या अहवालात होर्डिंग संदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचे समजते. आता आयुक्त या अहवालानुसार काय कारवाई करतात, याबाबत उत्सुकता आहे.
महापालिकेच्या विविध कर महापालिका हद्दीत २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागविण्यात आले होते. मात्र, यात ठेकेदार निवडताना विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून टेंडरमधील अटी व शर्ती बदलण्यात आल्याचा आरोप नाशिक आउटडोर व ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने केला होता.
या असोसिएशनच्या आरोपांनुसार महापालिका हद्दीत २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागवण्यात आले असताना त्या ठेकेदार कंपनीकडून अटी व शर्तीचे उल्लंघन होत असून खुल्या जागांसह वाहतूक बेटे, रस्ते दुभाजक, इमारती वापरात असलेल्या व वापरात नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर जाहिरात फलक उभारले गेले. टेंडरमध्ये फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कायदिशात मात्र प्रकाशित फलक युनिफोल एलईडी वॉल अशा सर्वच बाबींना परवानगी देण्यात आली.
प्रकाशित व अप्रकाशित जाहिरात फलक, एलईडी वॉलसाठी एकच दर लावले गेल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या ठेकेदार कंपनीने २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारणे अपेक्षित असताना ६३ ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला होता. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली.
आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र महिन्याभराच्या कालावधीनंतर समितीने अहवाल सादर केला आहे. आता या अहवालाप्रमाणे महापालिका आयुक्त काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.