Fire Bridge Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 90 मी. अग्निशमन शिडी खरेदीसाठी अखेर नवीन Tender राबवणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने ९० मीटर उंचीची अग्निशमन प्रतिबंधक शिडी खरेदी केलेली फिनलॅण्डची कंपनी दिवाळखोरीत गेली असून, मुदतीमध्ये त्यांच्याकडून पुरवठा होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर अखेर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी या खरेदीचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढच्या पंधरा दिवसांमध्ये नवीन टेंडर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी अग्निशमन विभागाला दिल्या आहेत. नवीन शिडीचा पुरवठा होईपर्यंत सध्याच्या ३२ मीटर उंचीपर्यंतची क्षमता असलेल्या शिडीवर कामकाज निभावले जाणार आहे.

नाशिक शहरामध्ये १२० मीटर उंचीपर्यंतचे गृहप्रकल्प मंजूर केले जात असतानाच अग्नीशामक व्यवस्था प्रभावी असण्याबाबतही कठोर नियम केले जात आहेत. यामुळे महापालिकेने पाच वर्षापूर्वी २०१८ मध्ये ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. अग्निशमन विभागाने राबवलेल्या टेंडर प्रक्रियेनुसार ९० मीटर उंचीची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यासाठी फिनलँड येथील मे. वेसा लिफ्ट ओये या कंपनीला नोव्हेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश दिले होते. कार्यारंभ आदेशानुसार या कंपनीने ३१ मे २०२३ पर्यंत पुरवठा करणे अपेक्षित होते.

दरम्यानच्या काळात ही कंपनीच दिवाळखोरीत निघाल्याचे पाच वर्षांनी पुरवठा करण्याची मुदत संपल्यानंतर अग्नीशामक विभागाच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत अवगत केले. तसेच, या शिडी खरेदीसाठी नवीन प्रक्रिया राबवायची ठरल्यास टेंडर व प्रत्यक्ष पुरवठा करण्यास दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो असेही लक्षात आणून दिले. ही बाब लक्षात घेत आयुक्तांनी आता सर्वप्रथम जुन्या शिडी खरेदीची प्रक्रिया रद्द केली आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सध्या ३० मीटर उंचीची क्षमता असलेली शिडी असून तिची मुदतही ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. ही शिडी महापालिकेने २१ ऑगस्ट २००८ रोजी खरेदी केली होती. या शिडीची मुदत पुढील वर्षी संपणार असली, तरी वाहनाची मुदत या ३१ ऑक्टोबरला संपणार आहे. या शिडीचा वर्षभर उपयोग करता यावा म्हणून या शिडीचे सध्याचे वाहन स्क्रॅप करून नवीन वाहनावर शिडी बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हातात वर्षाचा कालावधी असल्यामुळे नवीन टेंडर प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर राबवण्याचा प्रयत्न असणार आहे.