Fire Bridge Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 'अग्निशमन'ची 32 मीटरची शिडी भंगारात; तर 90 मीटर शिडीचे Tender वादात

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने ३२ मीटर उंच इमारतींच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फिनलँडहून खरेदी केलेल्या अग्निशमन शिडीचे (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म) पंधरा वर्षांचे आयुर्मान पुढील वर्षी संपत आहे. यामुळे चौदा वर्षापूर्वी साडेतीन कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेली हायड्रोलिक शिडी भंगारात जमा होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून पुढील वर्षी या वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान महापालिकेकडील ३२ मीटर उंचीची शिडी भंगारात जाणार असताना ९० मीटर उंचीची शिडी खरेदीचे टेंडर वादात सापडले आहे. यामुळे किमान सध्याची शिडी भंगारात जाण्याआधी नवीन शिडीची खरेदी पूर्ण व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने २००८ मध्ये परदेशी बनावटीची ३२ मीटर उंचीची हायड्रोलिक शिडी खरेदी केली होती. फिनलँड येथून ही शिडी मागवण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शहरात एकही ३२ मीटर उंचीची एकही इमारत नव्हती. त्यामुळे या हायड्रोलिक शिडीसाठी कोट्यवधींचा खर्च कशासाठी, असा सवालही उपस्थित केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता.

सुरुवातीला या शिडीची उपयोग अग्निशमन करण्यापेक्षा झाडांवर मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, उंच इमारतींतील दरवाजे लॉक झालेल्या सदनिकांमधील नागरिकांना बाहेर काढणे यांसारख्या कामांसाठीच वापर झाला.  

शासनाने २०१७ मध्ये लागू केलेल्या जुन्या विकास नियंत्रण नियमावलीत महापालिका क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या इमारतींना ३२ मीटर उंचीची मर्यादा होती. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये राज्य शासनाने मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांकरिता एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू केली. या नियमावलीत नाशिक शहरातील ९० मीटर उंचीपेक्षाही अधिक उंचीच्या इमारतींना मंजुरी देण्यात आली आहे.

शहराचा विस्तार वाढू लागला तसतसे या शिडीचे महत्त्व सर्वांनाच कळून चुकले. गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल कंपनीला या वर्षाच्या सुरवातीला लागलेल्या आगीत या हायड्रोलिक शिडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

दरम्यान २१ ऑगस्ट २००८ रोजी नोंदणी केलेल्या हायड्रोलिक शिडीच्या वाहन नोंदणीची मुदत पुढील वर्षी संपत आहे. या वाहनाची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून महापालिकेला कळविण्यात आले. त्यामुळे ही शिडी लवकरच भंगारात जमा होणार आहे.

९० मीटर शिडीचे टेंडर अडकले चौकशीत
एकीकडे साडेतीन कोटींची शिडी भंगारात जमा होत असतानाच दुसरीकडे ९० मीटर उंचीच्या नवीन अग्निशमन शिडी खरेदीची प्रक्रियाही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. एकीकडे शहरात उंचच्या उंच इमारतींच्या बांधकामांना नगररचना विभागामार्फत परवानगी देतानाच दुसरीकडे इमारतींच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणादेखील महापालिकेला तैनात ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यासाठी महापालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तब्बल २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अग्निशमन शिडीच्या खरेदीसाठी महापालिकेच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, या टेंडरमध्ये विशिष्ट ठेकेदारांना झुकते माप दिल्याने ही खरेदी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे शासनाकडून या टेंडरची सध्या चौकशी सुरू आहे.