नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यात यावर्षी पडलेला भीषण दुष्काळ व सर्व पाझर तलावांमधील पाणीसाठा संपल्याने मोठ्या धरणांप्रमाणेच जिल्ह्यातील मोठे व गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी ‘जलसमृध्द नाशिक’ मोहिम हाती घेतली आहे. यााठी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने पंधरा तालुक्यांमधील १९१ पाझर तलावांमधून साडेसात लाख घनमीटर गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च होणार आहे.
धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्यासाठी १६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान राबवण्यात येत आहे. धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना फक्त गाळ वाहून न्यायचा आहे. जिल्ह्यातील पाझर तलावांमधील गाळही या योजनेतून काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पाझर तलाव व बंधाऱ्यांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे.
त्यात तलावात नेमका किती गाळ साठला आहे, गाळ काढण्यासाठी अपेक्षित खर्च दिला आहे. जिल्ह्यातील १९१ तलावांमधील गाळ काढण्यासाठी अपेक्षित तीन कोटी ३७ लाख रुपये उभे खर्च येणार आहे. यासाठी लोकसहभागाबरोबरच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून ही कामे करण्यात येणार आहेत.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार
राज्यात मे २०१७ ते मार्च २०२१ पर्यंत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबवली जाते. अल्पभुधारक, विधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधन याकरिता ३१ रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरवण्यासाठी ३५.७५ रुपये प्रति घनमीटरप्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत व अडीच एकरला (हेक्टरी) ३७ हजार ५०० रुपये अनुदान मिळत होते. याअनुदानाविषयी जिल्हा प्रशासनाने अद्याप कुठलिही घोषणा केलेली नाही.
गाळमुक्त धरणचा तालुकानिहाय आराखडा
तालुका पाझर तलाव गाळ (घमी) रक्कम
पेठ १० ३३८०० १५ .७ लाख
दिंडोरी २२ ८१५८५ ३६.३८ लाख
सुरगाणा ९ ३७००० १६.५० लाख
कळवण १३ ४१७०० १८.५९ लाख
सिन्नर १५ ४९९५० २२.२७ लाख
येवला १६ ५१६०० २३.०१ लाख
चांदवड ९ ३३००० १४.७१ लाख
निफाड २० ४८५०० २१.६३ लाख
नांदगाव ११ ८०००० ३५.६८ लाख
मालेगाव ९ ६३००० २८.९ लाख
इगतपुरी ८ ३१५०० १४.०४ लाख
त्र्यंबकेश्वर ८ ३६००० १६.०५ लाख
बागलाण २३ १००७०० ४४.९१ लाख
नाशिक ५ १५२०० ६.७७ लाख
देवळा १३ ४८००० २३.१९ लाख
एकूण १९१ ७५१५३५ ३.३६ कोटी रुपये