नाशिक (Nashik) : ग्रामपंचायतींना घरपट्टी हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. नाशिक जिल्ह्यात १३८९ ग्रामपंचायती असून, त्यांना ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत १०७ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या ग्रामपंचायतींनी ८०.०७ टक्के म्हणजे ८६ कोटी ७० लाख रुपये घरपट्टी वसुली झाली आहे. कळवण व दिंडोरी या आदिवासी बहुल तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची सर्वाधिक घरपट्टी वसुली झाली असून, देवळा व सिन्नर हे तालुके सर्वाधिक पिछाडीवर आहेत.
पंचायत राज्य व्यवस्थेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रीस्तरीय रचनेच ग्रामपंचायत हा सर्वात छोटा घटक आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी सरकारकडून वित्त आयोग, ग्रामविकास विभाग यांच्याकडून निधी दिला जात असला, तरी ग्रामपंचायतीलाही घरपट्टीच्या माध्यमातून स्वउत्पन्न मिळत असते. ग्रामपंचायत पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी १९६२ मध्ये ग्रामसचिवांची नेमणूक केली गेली.
घरपट्टी करातून गावातील सार्वजनिक विकासाची कामे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केली जातात. गावातील नागरिकांकडून घरपट्टी तसेच इतर घटकांतून ग्रामपंचायत कर आकारणी स्वरूपात रक्कम वसूल केली जाते. त्यातून ग्रामपंचायतींचा खर्च भागवण्यात येतो. वर्षानूवर्षे थकीत ठेवलेले ग्रामपंचायतींचे कर भरण्यासाठी विविध मार्गाने नागरिकांमध्ये जागृती करण्यात येते.
जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये १ हजार ३८९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना ३१ मार्च अखेर १०७ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी मार्च अखेरपर्यंत ८६ कोटी ७० लाख ४२ हजार रुपयांची वसुली झाली आहे. आदिवासी तालुके असलेल्या दिंडोरी व कळवण तालुक्यात सर्वाधिक (अनुक्रमे १२.४४ कोटी व २.१८ कोटी) घरपट्टी वसुली करण्यात ग्रामपंचायतींना यश आले आहे.
त्यापाठोपाठ बागलाण येथे ६.४१ कोटी, तर सुरगाणा येथे २.१६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. सिन्नर तालुक्यांतून १२.८७ कोटींची वसुली अपेक्षित असताना ९.५१ कोटींची वसुली झाली आहे.
तालुकानिहाय घरपट्टी वसुली
नाशिक : ९.६६ कोटी
इगतपुरी : ११ कोटी
त्र्यंबकेश्वर : ४ कोटी
पेठ : १.४९८ कोटी
सुरगाणा : २.१६ कोटी
दिंडोरी : १२.४४ कोटी
कळवण : २.१८ कोटी
देवळा : ९९ लाख
बागलाण : ६.४१ कोटी
चांदवड : ४ कोटी
मालेगाव : ५.५२ कोटी
नांदगाव : २.६१ कोटी
येवला : २.५६ कोटी
निफाड : १२ कोटी
सिन्नर : ९.५१ कोटी