नाशिक (Nashik) : ओझर येथील हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल (HAL) या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगाला आता सुखोई ३० एमकेआय ही लढाऊ विमाने तयार करण्याचे जवळपास अकरा हजार कोटींचे महत्त्वाचे काम मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया (Make In India) या योजनेंतर्गत सर्व खरेदी संरक्षण मंत्रालय करणार आहे.
केंद्र सरकारने भारतीय हवाई दलासाठी १२ सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांची घोषणा केली आहे. ती सर्व विमाने नाशिक येथील हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलमध्ये तयार होणार आहेत. 'मेक इन इंडिया' अंतर्गत हा उपक्रम राबवला जाईल.
हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मान्यता दिली. संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार डिफेन्स एक्विझिशन कौन्सिलने जवळपास ४५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली प्रस्तावानंतर मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबरला यासंदर्भात बैठक झाली. त्यात या लढाऊ विमानाची खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून केली जाणार आहे. म्हणजेच एचएएलने तयार केलेली विमानेच संरक्षण मंत्रालय खरेदी करणार आहे.
'सुखोई'च्या निर्मितीचा हा प्रकल्प ११ हजार कोटी रुपयांचा आहे. गेल्या काही वर्षांत हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देताना मीग २१ या प्रकारच्या अनेक विमानांचा अपघात झाला. यामुळे संरक्षण मंत्रालयाने मीग विमाने हटवली आहे. त्या विमानांची जागा घेण्याचे काम नवे 'सुखोई' करतील.
सुखोई हे मल्टिरोल लढाऊ विमान असून, यातून हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारे युद्ध लढण्याची क्षमता आहे. यामुळे हवाई दलातील प्रशिक्षणार्थींना सरावासाठी अधिक सुरक्षित व अत्याधुनिक लढाऊ विमाने उपलब्ध होऊ शकणार आहेत.