नाशिक (Nashik) : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवात देशातील साडेसात हजार युवक-युवती कला व संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते १२ जानेवारीस या महोत्सवाचे उदघाटन होणार असून, पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवास मुख्यमंत्र्यांसह जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ व केंद्रीय युवक व कल्याण मंत्री सहभागी होणार आहेत. या युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहराचे देशपातळीवर ब्रॅन्डिंग होणार असून, या संपूर्ण महोत्सवासाठी केंद्र व राज्य सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयांनी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देशातील २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची माहिती देण्यासाठी राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास गर्ग व नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार घेत युवा महोत्सवाची माहिती दिली. तब्बल १६ वर्षांनी महाराष्ट्राला युवक महोत्सवाचा मान मिळाला आहे.
नाशिकमध्ये प्रथमच युवा महोत्सव होत असल्याने स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक अशा दोन पातळीवर त्याचे नियोजन सुरू आहे. पंचवटीतील मोदी मैदानासह महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कला दालन, कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह आणि गंगापूर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदोजी महाराज म्युझियममध्ये १३ ते १५ जानेवारी या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक राज्यातून १०० युवक-युवती व त्यांचे सहकारी असे एकूण साडेसात हजार व्यक्ती या महोत्सवाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणार आहेत. या युवकांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी १२८ हॉटेल्स बूक करण्यात आली आहेत. त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
देशभरातून येत असलेल्या या युवकांचे विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील हनुमान नगरमध्ये महायुवा ग्राम साकारले आहे. यातून सुविचारांचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे. या युवाग्रामध्ये महायुवा एक्स्पो अंतर्गत महाराष्ट्र देशाला काय देवू शकतो या विचारांतून कला, संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य व उपचार, साहसी क्रीडाप्रकार या पाच बाबींवर चर्चा होणार आहेत.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शहराचे ब्रॅन्डिंग होत असल्याने शहरासह ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व क्रीडा आयुक्त डॉ.गर्ग यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचा रोड शो
पंतप्रधान नरेंद मोदी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर नाशिकमध्ये रोड शो करणार आहेत. छत्रपती संभाजी नगर मार्गावरील मिर्ची चौक ते साधुग्राम मैदानावरील सिटी लिंक बसडेपोपर्यंत हा रोड शो असेल.
हॉटेल चालकांना ‘अच्छे दिन’
युवक महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातून साडेसात हजार युवक नाशिकमध्ये पाच दिवस राहणार आहेत. त्यांच्यासाठी निवासाची नाशिक शहरातील १२८ हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने नाशिकमधील हॉटेल व्यवसायाला चालना मिळाली आहे.