ST Bus Stand - MSRTC Tendernama
उत्तर महाराष्ट्र

MSRTC: ठेका नूतनीकरण न केल्याने एसटीचे Smart Card ऑफलाइन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : एसटी (ST Bus) प्रवासात सवलत मिळवण्यासाठी अनिवार्य केलेले स्मार्ट कार्ड (Smart Card) तयार करणे व त्याचा ऑनलाइन डेटा सांभाळण्याचे काम एसटीने एका खासगी कंपनीस दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतर या कराराचे नूतनीकरण न केल्यामुळे कंपनीने आपली सेवा बंद केली आहे. यामुळे एसटीकडून (MSRTC) लाभार्थ्यांना देण्यात आलेले सर्व स्मार्ट कार्ड बाद ठरले आहेत. यामुळे राज्यात एप्रिलपासून सवलतधारक लाभार्थ्यांसाठी ऑफलाइन कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे बस प्रवास भाड्यात सवलत असलेल्या दिव्यांग, महिला, खेळाडूंसह विविध घटकांसाठी स्मार्टकार्ड सुरू करण्यात आले. साधारण २०१८ पासून कार्यान्वित झालेल्या स्मार्टकार्डाद्वारे लाभार्थ्यांना सवलतीत प्रवास करण्याची सोय आहे. स्मार्टकार्ड वाहकाकडील मॅट्रिक्स तिकीट मशिनमध्ये कार्ड पंचिंग केल्यानंतर त्यात नोंद होऊन सवलतीत प्रवासाची सोय होते. मात्र, स्मार्टकार्डसाठी दिलेल्या ठेक्याच्या जुन्या दरात वाढ होत नसल्याने ठेकेदाराने स्मार्टकार्ड तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे राज्यात एका झटक्यात सगळे स्मार्टकार्ड बाद ठरले आहेत.

राज्यात महिलांसाठी पन्नास टक्के भाड्यात सवलतीची योजना आता सुरू झाली आहे. मात्र त्याआधीपासून ज्येष्ठ नागरिक,स्वातंत्रसैनिक, आमदार, दिव्यांग, दलितमित्र, पत्रकार, दिव्यांग, खेळाडू यांसह विविध पुरस्कारार्थींसाठी सवलतीत बसप्रवासाची सुविधा आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून स्मार्टकार्ड दिले गेले.

साधारण चार ते साडेचार वर्षांपासून सुरू असलेली ही प्रणाली एप्रिलपासून राज्यभर ठप्प पडली आहे. सर्व स्मार्ट कार्ड बंद पडल्याने आता वाहकाकडील मशीनवर त्याची नोंद करणे बंद झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका दिला होता. त्यासंबंधित ठेकदार संस्था आणि परिवहन महामंडळ यांच्यात कार्डापोटीच्या रक्कम वाढीबाबत एकमत होऊ न शकले नाही. यामुळे ठेकेदाराने मुदत संपल्याने कार्डाचे कामकाज करायला तसेच त्यांचे नूतनीकरण करायला विरोध दर्शविला.

परिणामी, सवलत योजनेसाठी स्मार्टकार्ड कार्यान्वित नसल्याने महामंडळाने पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घटकांसाठी ओळखपत्र तयार करण्याची पद्धत सुरू केली आहे. सगळ्या यंत्रणा ऑनलाइन कामकाजाकडे जात असताना परिवहन महामंडळाचे कामकाज ऑफलाइनकडे गेले आहे.