नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या चहूबाजूने महामार्गानी येणारी वाहतूक बाहेरून जाण्यासाठी वळण रस्ता प्रस्तावित केला असून तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने करण्यास राज्य सरकारने तत्त्वता मान्यता दिली असताना खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक शहराबाहेरून १३५ किलोमीटरचा आणखी एक बाह्य रिंगरोड करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बाह्य रिंग रोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे सिंहस्थापूर्वी नाशिक शहराबाहेर दोन रिंगरोड होणार असल्याची चर्चा आहे.
नाशिक-पुणे, मुंबई आग्रा, छत्रपती संभाजी नगर -नाशिक या मार्गावरील वाहतूक गरज नसताना नाशिक शहरात येऊन होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक शहराबाहेरून जाणारे दोन रिंगरोड महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार नाशिकरोड येथील नगररचना सहायक संचालक विभागाने नाशिक महापालिकेकडून या दोन्हीही रिंगरोडसाठी किती क्षेत्र बाधित होईल याची शिवारनिहाय माहिती मागवली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी महापालिकेने दोन रिंगरोडचा प्रस्तावित केले आहेत. आहे. या दोन रिंगरोडसाठी महापालिकेने रेखांकन केले असून साधारणपणे २६० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. महापालिकेने यापूर्वीच जानेवारीत रिंगरोड बाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाच्याअनुषंगाने राज्य शासनाच्या नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयाने एक नकाशा तयार करून दोन्ही रिंगरोडचा मार्ग कसा असेल याची माहिती मे मध्ये मागवली आहे. यामुळे पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पापासून नाशिकरोड, दसक ते आडगाव टर्मिनस असा ६० मीटर रुंद,२६ किमी लांबी व आडगाव ट्रक टर्मिनसपासून म्हसरुळ, मखमलाबाद, चांदशी, अंबड एमआयडीसीमार्गे गरवारे विश्रामगृहापर्यंत ३६ मीटर रुंदीचा व ३० किलोमीटरलांबीचा असे असे दोन रिंगरोड सिंहस्थापूर्वी साकारले जातील, असे नियोजन आहे.
दरम्यान हेमंत गोडसे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता वर्षा अहिरे, कार्यकारी अभियंता दीपक पवार, उप अभियंता जितेंद्र नेहते आदी उपस्थित होते. यावेळी खासदार गोडसे यांनी शहराच्या विकासासाठी आणि भविष्यात उद्भवणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी बाह्य रिंगरोडचा प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. प्रस्तावित बाह्य रिंगरोडसाठी डीपीआर तयार करणे, भूसंपादन आणि रस्ता बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेत इतर कामाऐवजी बाह्य रिंगरोड संदर्भातील प्रस्ताव शक्य होईल तितक्या लवकर तयार करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना बाह्य रिंगरोडसंदर्भात पत्र दिले आहे. शहरातील वाढती वाहतूक, २०२७ साली शहरात होणारा सिंहस्थ उत्सव यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी बाह्य रिंगरोड गरजेचा आहे. काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात आता आणखी एका बाह्य रिंग रोडची भर पडली आहे.
प्रस्तावित बाह्य रिंग रोड
अंतर : १३५ किलोमीटर
गावे : जानोरी फाटा, सय्यद पिंपरी, लाखलगाव, जाखोरी, शिंदे, विंचूर दळवी, साकुरफाटा, वाडीव-हे, खंबाळे, महिरावणी, दुगाव, गिरणारे, रामशेज, आंबे दिंडोरी.